इफ्फीत आज ‘एस. दुर्गा’चे ज्युरींसाठी प्रदर्शन

0
117

पणजीत सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवडला गेलेला व नंतर अश्‍लीलतेचा आरोप करून सदर विभागातून गाळण्यात आलेला ‘एस्. दुर्गा’ ह्या चित्रपटाच्या खेळाचे इंडियन पॅनोरमा विभागाच्या ज्युरीसाठी आज सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट केवळ ज्युरींसाठी दाखविण्यात येणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सनलकुमार यांनी आपला चित्रपट गाळण्यात आल्यानंतर केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने सदर चित्रपट इफ्फीत दाखवण्यात यावा असा आदेश दिला होता. सनल कुमार यांनी आपल्या चित्रपटाची सेन्सॉर करण्यात आलेली कॉपी सेन्सॉर प्रमाणपत्रासह शनिवारी इफ्फीचे संचालक सुनील टंडन यांना सादर केली. या पार्श्‍वभूमीवर आज या चित्रपटाच्या खेळाचे इंडियन पॅनोरमा विभागाच्या ज्युरीसाठी आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी ६ वा. ज्युरीना चित्रपट दाखवण्यात येणार आहे. मंगळवारी इफ्फीचा समारोप होत आहे. त्यामुळे हा चित्रपट दाखवायचा झाल्यास मंगळवारी सकाळी इफ्फीच्या शेवटच्या दिवशी दाखवावा लागणार आहे.

एस्. दुर्गा प्रमाणेच ‘न्यूड’ हा मराठी चित्रपटही इंडिएन पॅनोरमा विभागातून गाळण्यात आलेला आहे. ज्युरीनी इंडिएन पॅनोरमा विभागातील ओपनिंग फिल्म म्हणून न्यूडची निवड केली होती. पण नंतर ज्युरीना माहिती न देताच ‘न्यूड’ व ‘एस्. दुर्गा’ ह्या चित्रपटांवर अश्‍लीलतेचा शिक्का मारून दोन्ही चित्रपट इंडिएन पॅनोरमा विभागातून गाळण्यात आले होते. न्यूडचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी न्यायालयात आव्हान न दिल्याने त्यांच्या चित्रपटाविषयी काहीशी निर्णय होऊ शकला नाही.