यंदाचा मार्च सगळ्यात उष्ण महिना

0
14

>> २०१० मधील मार्चचे तापमान ओलांडले

>> १९०१ नंतर सर्वाधिक उष्ण तापमान

भारताच्या गेल्या १२१ वर्षांतील यंदाचा मार्च महिना सर्वात उष्ण मार्च महिना होता अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांतदेखील वातावरण उष्णच राहण्याचा अंदाज आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मार्चमध्ये नोंदवलेले तापमान हे १९०१नंतरचे सर्वाधिक तापमान आहे. यंदाच्या मार्चमध्ये नोंद झालेल्या तापमानाने मार्च २०१० च्या सरासरी कमाल तापमानाला मागे टाकले.

मार्च २०१० मध्ये भारतातील सरासरी मासिक दिवसाचे तापमान ३३.०९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. यंदा मार्चमध्ये देशातील अनेक भागात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. यंदा मार्च महिन्यात सरासरी मासिक दिवसाच्या तापमानाचा पारा ३३.१ अंशांपर्यंत नोंदवला गेला होता. दिल्लीत २० मार्च रोजी पितमपुरा मॉनिटरिंग स्टेशनवर कमाल तापमान ३९.९ अंश सेल्सिअस होते, तो वर्षातील सर्वात उष्ण दिवस होता.

हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा ४.५ अंशांनी जास्त होते. विभागाने दिलेल्या माहितीनुसार मासिक सरासरी कमाल तापमानाच्या बाबतीत मार्च २०२१ मधील तापमानाची नोंद १२१ वर्षांतील तिसरा सर्वात उष्ण महिना म्हणून केली गेली आहे.

यावर्षी मार्चमध्ये संपूर्ण देशातील कमाल तापमान सामान्यपेक्षा १.८६ अंश सेल्सिअस जास्त आहे.
मार्च महिन्यात दोन उष्णतेच्या लाटा, पावसाचा अभाव, चक्रीवादळाच्या स्थितीमुळे तयार झालेले कमी दबावाचे क्षेत्र ज्यामुळे उत्तर आणि मध्य भारतात उष्ण तापमान होते. जागतिक तापमान वाढ हे देखील एक प्रमुख कारण होते.