म्हादई व्याघ्र क्षेत्र घोषणेचा विचार नाही

0
95

रिचर्ड डिसोझा यांची माहिती
म्हादई अभयारण्य हे व्याघ्रक्षेत्र घोषित करण्याचा सध्या तरी वन खात्याचा कोणताही विचार नसल्याचे राज्याचे अतिरिक्त विशेष मुख्य वनपाल रिचर्ड डिसोझा यांनी सांगितले.
एखादे अभयारण्य अथवा वनक्षेत्र व्याघ्रक्षेत्र घोषित करायचे झाल्यास त्या अभयारण्यात किंवा वनक्षेत्रात पिल्लांना जन्म देणारी वाघीण व वाघ असे जोडपे असायला हवे अशी अट आहे. म्हादई अभयारण्यात आतापर्यंत जे कॅमेरे लावण्यात आले होते त्या कॅमेर्‍यात एकाच वाघाचे छायाचित्र टिपले गेलेले आहे. तेथे आणखीही वाघांचे अस्तित्व असावे असे पर्यावरण तज्ज्ञांचे व अन्य काही जाणकारांचे म्हणणे असले तरी त्याला तसा कोणताही शास्त्रीय आधार नाही, अथवा पुरावेही नाहीत, असे डिसोझा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोव्यातील एकूण वनक्षेत्रात वाघांसह अन्य कोणकोणत्या जातींच्या किती प्राण्यांचे अस्तित्व आहे याची गणना करण्याचे काम २०१७ सालापर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे राज्यात अन्य वन्यप्राण्यांबरोबरच वाघांची नेमकी संख्या किती आहे हे २०१७ सालीच स्पष्ट होऊ शकणार असल्याचे डिसोझा म्हणाले.
गोव्यातील एखादे अभयारण्य व्याघ्रक्षेत्र घोषित करण्यासारखी स्थिती असली तर ते अभयारण्य निश्‍चित व्याघ्रक्षेत्र घोषित केले जाणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.