म्हादई लवादाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकला पाणी देऊ नये ः कॉंग्रेस

0
127

म्हादईप्रश्‍नी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतलेला निर्णय गोव्याच्या हिताविरोधात असून म्हादई पाणी तंटा लवाद आपला निर्णय देईपर्यंत गोव्याने कर्नाटकला पाणी देऊ नये, अशी कॉंग्रेसची मागणी आहे, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी गोवा सरकारने कर्नाटकला पाणी देण्याचा निर्णय घेतल्यास कॉंग्रेस रस्त्यावर येईल असा इशारा दिला.

कर्नाटकमध्ये लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप हा खेळ खेळत असून हा खेळ गोव्याला महाग पडणार असल्याचे लॉरेन्स यांनी यावेळी स्पष्ट केले.

पाणी तंटा लवादासमोर कर्नाटकची बाजू लंगडी पडलेली असून गोव्याची बाजू मजबूत आहे. ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्याची बाजू समर्थपणे मांडलेली आहे. त्यामुळे कर्नाटकला आपला पराभव डोळ्यांपुढे दिसू लागल्याने कर्नाटकने अमित शाह यांच्या मदतीने हे सगळे केले आहे. मात्र, पर्रीकर यांनी अमित शाह यांच्या दबावाला बळी पडून गोवा व गोव्याच्या पर्यावरणाचा बळी देऊ नये, अशी मागणीही नाईक यांनी केली.

गोवा सरकारने कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू दिल्यास पश्‍चिम घाटातील पर्यावरण व जीवसृष्टी यांच्यावर विपरीत परिणाम होईल, असे सांगून मांडवी नदीचे पात्रही कोरडे पडण्याची भीती नाईक यांनी व्यक्त केली.

अंतरीम करार कायम होईल
न्यायालयाने कर्नाटकला धरणाचे काम बंद ठेवण्याचा आदेश दिलेला असतानाही त्यांनी ते काम चालू ठेवले. असे असताना गोवा सरकार आता त्यांना पाणी देण्यास कसे काय तयार झाले असा सवाल नाईक यांनी केला.
कर्नाटकला पाणी देण्यासाठी आम्ही अंतरिम करार करीत आहोत असे पर्रीकर म्हणतात असे सांगून एकदा हा करार केला की तो अंतरिम राहणार नसून तो कायमचा करार होईल, असे नाईक म्हणाले.

गोव्यात भाजपचे सरकार हे आघाडी सरकार आहे. विधानसभेत त्यांची संख्याही १३ असून त्यांना पाठिंबा देणारे गोवा फॉरवर्ड मगो व अपक्ष आमदार यांचा त्यांना याकामी पाठिंबा आहे काय. त्याबाबत सरकारने त्यांना विश्‍वासात घेतले आहे काय, असा सवालही नाईक यांनी यावेळी केला.

विधीमंडळ बैठकीनंतर पुढील कृती
कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची लवकरच बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत पक्ष यासंबंधीची आपली पुढील कृती ठरवणार असल्याचे यावेळी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले. गरज पडल्यास आम्ही याप्रश्‍नी रस्त्यावर येणार असल्याचे ते म्हणाले.
म्हादईप्रश्‍नी बोलायचेच झाले तर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्याशी बोलायला हवे. पण त्याऐवजी ते येडियुरप्पा यांच्याशी कसे काय चर्चा करतात असा प्रश्‍नही रेजिनाल्ड यांनी यावेळी उपस्थित केला.