म्हादई पाणी प्रश्‍नावर आज कर्नाटक बंद

0
145

>> कर्नाटकात जाणार्‍या कदंबच्या ३७ बसेस रद्द

>> सुरक्षेच्या कारणामुळे महामंडळाचा निर्णय

म्हादईच्या पाणी प्रश्‍नावर कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या कन्नड संघटना, शेतकरी संघटना यांनी आज गुरुवार २५ रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर कदंब वाहतूक महामंडळाने सुरक्षेच्या कारणास्तव उत्तर कर्नाटकात जाणार्‍या ३७ बसगाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हादईचे पाणी उत्तर कर्नाटकात वळविण्यास कळसा – भांडुरा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळे हा बंद आयोजित करण्यात आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत आयोजित कर्नाटक व गोवा भाजप नेत्यांच्या संयुक्त बैठकीत कर्नाटकातील भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी म्हादईचे ७.५६ टीएमसी पाणी पिण्यासाठी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पिण्यासाठी पाणी देण्यास चर्चा करण्यास तयार असल्याचे पत्र कर्नाटकातील भाजप नेते येडियुरप्पा यांना पाठविल्याने म्हादईचा विषय गोव्यात तापला आहे. तसेच कळसा येथे कर्नाटकाकडून पाण्याचा नैैसर्गिक स्रोत अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विरोधात म्हादई प्रेमींनी आवाज उठविल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

मागील महिन्यात उत्तर कर्नाटकातील पाच जिल्ह्यांत म्हादईच्या पाणी प्रश्‍नावरून बंद पाळण्यात आला होता. मागील कित्येक वर्षांपासून कर्नाटकाकडून म्हादईचे पाणी वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्तर कर्नाटकातील शेतीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील महिन्यात होणार्‍या बंगलोर दौर्‍याच्या वेळी निदर्शने करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

कळसावर घातलेला बांध
कर्नाटकाने ७० टक्के हटविला

गोव्याने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कर्नाटकाने कणकुंबी येथे गोव्याकडे येणारा कळसाचा प्रवाह रोखण्यासाठी घातलेला बांध सुमारे ७० टक्के हटविला असून पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात गोव्याच्या दिशेने येण्यास आरंभ झाल्याची माहिती म्हादई बचाव अभियानाचे सरचिटणीस राजेंद्र केरकर यांनी काल दिली.

बांधाची सगळी माती काढून टाकल्याशिवाय पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरू होणार नसल्याचे केरकर यांनी स्पष्ट केले. कर्नाटकने कणकुंबी येथे बांध घालण्यासाठी जी यंत्रसामुग्री तेथे आणली होती ती तेथून हलवली आहे. जलसंसाधन खात्याने अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या चार अभियंत्यांच्या पथकाने काल कणकुंबी येथे भेट देऊन पाहणी केली. पथकाने आपला अहवाल तयार केलेला असून तो सरकारला सादर करण्यात येणार आहे.

गोव्याच्या कडक भूमिकेची कर्नाटकाने धास्ती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात चालू असलेले काम बंद ठेवण्यात आले आहे. सर्व प्रकारची यंत्रसामग्री तातडीने हलवण्यात आली असल्याने गोव्याला काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. लवादासमोर ६ फेब्रुवारीला सुनावणी असून त्यापूर्वी तातडीने नवीन अर्जावर सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती गोव्याने लवादाला केली आहे. ती मान्य होणार का याकडे लक्ष लागले आहे.