ड्रोनद्वारे पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रयोग यशस्वी

0
117

गोवा पोलिसांनी किनारी भागातील विदेशी व देशी पर्यटकांची सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीच्या कार्यक्रमांवर देखरेख ठेवण्यासाठी पहिल्यांदाच केलेला ड्रोनचा वापर यशस्वी ठरल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी काल दिली. गोवा पोलीस दहशतवाद विरोधी पथकाला या अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेचे व्यवस्थापन हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. आगामी काळात मोठे कार्यक्रम, समुद्र किनार्‍यांवर पाळत ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वागातोर येथे झालेल्या टाइम आउट ७२ या संगीत महोत्सवात सुरक्षा व्यवस्था तसेच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येच्या वेळी वागातोर, बागा, कांदोळी, कळंगुट या किनार्‍यांवरील दोन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी यशस्वीरीत्या करण्यात आला. झूम सक्षम कॅमेर्‍यासह सज्ज असलेल्या ड्रोनच्या साहाय्याने परिसरातील एकंदर हालचालींवर देखरेख ठेवण्यात आली होती. रात्रीच्या काळात विशेष थर्मल सेन्सिंग कॅमेर्‍यांचा पाळत ठेवण्यासाठी वापर करण्यात आला. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशयास्पद हालचाली, अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखरेख ठेवली जात होती.