म्हादईप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

0
202

>> विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयात गोव्याची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील ऍड्. अरविंद दातार यांनी गोवा सरकारचा सल्ला घेऊनच म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित करण्यास विरोध केला नव्हता हे उघड केल्याने गोव्यातील भाजप सरकारने आई म्हादईचा विश्‍वासघात केल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या अपयशाची जबाबदारी घेऊन त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित करण्यास सर्वोच्च न्यायालयासमोर विरोध करण्यास गोव्यातील भाजप सरकारला कोणी, का व कशासाठी रोखले हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी कामत यांनी केली आहे. आता सारवासारव करण्याचे दिवस संपले असून गोव्यातील भाजप सरकारने राजकीय स्वार्थासाठी आई म्हादईचा सौदा केला हे उघड आहे, असा दावा त्यांनी केला.

गोवा विधानसभा अधिवेशनात आपण म्हादई प्रश्‍नावर लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चा चालू असताना सरकार काही तरी लपवण्याचा प्रयत्न करीत आहे याची जाणीव आम्हांला झाली होती. सरकारने यापूर्वीच्या अधिवेशनात म्हादईवर दाखल केलेला स्थगन प्रस्ताव दाखल करून घेतला नव्हता याची आठवण कामत यांनी करून दिली.

सरकारने लोकांच्या भावनांशी खेळणे बंद करावे व सत्य परिस्थितीवर आकडेवारी व तथ्यांच्या आधारे माहिती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे.