>> डीपीआरला मान्यता दिल्याने गोव्याची याचिका
सर्वोच्च न्यायालयात गोवा सरकारने म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्या प्रश्नी दाखल केलेल्या इंटरलॉक्युटरी अर्जावर (आयए) सोमवार 13 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारच्या म्हादई नदीचे पाणी वळविणाऱ्या कळसा भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) मान्यता दिल्यानंतर गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात इंटरलॉक्युटरी अर्ज दाखल केला आहे. राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात म्हादई पाणी वाटपप्रश्नी आव्हान याचिका आहे. कर्नाटक सरकारच्या म्हादईचे पाणी वळविण्याच्या सुधारित डीपीआरला मान्यता देण्यात आल्याने गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात खास अर्ज दाखल केला आहे.
कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्यातील पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत. म्हादईचे पाणी वळविणे कायद्याच्या विरोधात आहे, असा दावा अर्जात करण्यात आला आहे. या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेण्यास मान्यता दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर हा अर्ज सुनावणीला येणार आहे.
केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकाच्या म्हादई नदीचे पाणी वळविणाऱ्या सुधारित डीपीआरला मान्यता दिल्यानंतर गोवा सरकारच्या वनविभागाने कर्नाटक सरकारला नोटीस पाठवून म्हादई अभयारण्याचा मुद्दा उपस्थित करून नदीचे पाणी वळविण्यास विरोध केला आहे. तथापि, कर्नाटक सरकारने गोवा सरकारच्या वनखात्याचा हा दावा खोडून काढला असून म्हादई जललवादाने कर्नाटकला मंजूर केलेले पाणी गरजेनुसार पावसाळ्यात वळविले जाणार असल्याचा दावा केला आहे.
कर्नाटकला नोटीस
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गोदावर्मन प्रकरणामध्ये म्हादई, भीमगड अभयारण्याचा भाग बफर झोन जाहीर करण्याच्या एका याचिकेला अनुसरून कर्नाटक सरकार, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला नोटीस बजावलेली आहे. त्यात म्हादई वन्यजीव अभयारण्य, भीमगड पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
राज्यभरात घरोघरी कलशपूजन
‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’च्या आवाहनास प्रतिसाद
म्हादई नदीच्या रक्षणासाठी घरोघरी पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन केले जावे असे आवाहन ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंट’ ने केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत काल रविवारी राजधानी पणजीसह गोवाभरातील हजारो लोकांनी आपापल्या घरी पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन केले. तसेच यावेळी समई प्रज्वलित करत दीपपूजनही केले.
राज्यभरातील हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मियांनी आपापल्या धर्म व परंपरेनुसार पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन केले. कुणी समई पेटवून तर कुणी मेणबत्ती पेटवून हे पूजन केले. त्यात घराघरातील आबालवृद्धांनी भाग घेऊन गोव्यातील म्हादई नदीचे अस्तित्त्व अबाधित रहावे, असे देवाला साकडे घातले.
राज्यभरातील गोमंततकीयांनी आपले पक्षीय मतभेद बाजूला सारून म्हादई मातेच्या रक्षणासाठी अगदी भावपूर्णरित्या हे अनोखे असे पूजन केले. म्हादईवरून राज्यभरातील लोकांमध्ये राजकीय नेत्यांविषयी व विशेष करून सत्ताधारी नेत्यांविषयी संतापाची लाट असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
म्हादईला माता असे संबोधणारे राजकीय नेते आता याच मातेचा लिलाव करत आहेत. सत्ता व पैसा यापुढे त्यांना काहीच दिसत नाही काय? सत्तेसाठी हे नेते एवढे आंधळे बनले आहेत काय, अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या राज्यभरात व्यक्त केल्या जात आहेत.