म्युटेशन विभागाची कागदपत्रे जळून खाक

0
6

काणकोणच्या प्रशासकीय इमारतीतील प्रकार; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

काणकोणच्या प्रशासकीय इमारतीच्या मामलेदार कार्यालयाशी संबंधित असलेल्या म्युटेशन विभागाच्या कार्यालयाला मंगळवारी पहाटे आग लागली. त्यात म्युटेशनची अत्यंत महत्वाची काही कागदपत्रे जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची माहिती काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर आणि मामलेदार मनोज कोरगावकर यांनी दिली.
सदर प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर मामलेदार, संयुक्त मामलेदार, म्युटेशन विभाग, नागरी पुरवठा आणि उपजिल्हाधिकारी कार्यालये चालतात. सोमवारी संध्याकाळी 5 च्या दरम्यान म्युटेशन विभागाच्या विद्युत सर्किटजवळ जळाल्याचा वास यायला लागल्यानंतर काणकोणच्या वीज कार्यालयाला याची खबर देण्यात आली. वीज कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, काहीच आक्षेपार्ह असे आढळले नाही. मात्र पहाटे अकस्मात म्युटेशन विभाग कार्यालयाला आग लागली. सुरुवातीला कार्यालयातील एका पंख्याला आग लागली आणि नंतर ती पसरत जाऊन त्या आगीत काही महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज जळून खाक झाले.

‘सागर कवच’मुळे मोठा अनर्थ टळला
काणकोणच्या मामलेदार कार्यालयात विशेषत: पावसाळी हंगामात 24 तास नियंत्रण कक्षाची सोय केलेली असते; मात्र सध्या ही व्यवस्था स्थगित करण्यात आलेली आहे; मात्र 24 एप्रिलपासूनच ‘सागर कवच’खाली या कार्यालयात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, काल पहाटे 6 च्या दरम्यान ज्यावेळी आपली ड्युटी संपवून हे कर्मचारी कार्यालयात आले, त्यावेळी त्यांना जळाल्याचा वास आला. त्यांनी कार्यालयात प्रवेश केला असता ही आगीची घटना निदर्शनास आली. त्यांनी लगेच पाण्याचा वापर करून आग विझविली. अन्यथा सर्व कागदपत्रे जळण्याची शक्यता होती.

तरीही सर्व दस्तऐवज सुरक्षित
या आगीत म्युटेशनचे दस्तऐवज जरी जळून खाक झालेले असले तरी बहुतेक सर्व दस्तऐवज संगणकामध्ये सुरक्षित आहेत. ज्या अर्जदारांनी म्युटेशनससाठी अर्ज करूनही सरकारी तिजोरीत शुल्क जमा केले नव्हते, त्याचप्रमाणे काही जुने दस्तऐवज जे होते, त्यांचा यात समावेश आहे. शक्यतो सर्व दस्तऐवज पूर्ववत तयार करण्याकडे लक्ष दिले जाईल, असे मामलेदार मनोज कोरगावकर यांनी सांगितले.