म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी गोमेकॉत खास वॉर्ड

0
101

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती; नव्या तीन रुग्णांची नोंद

राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोमेकॉमधील १०२ वॉर्ड म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल दिली. दरम्यान, म्यूकर मायकोसिसचे आणखी नवे ३ रुग्ण आढळून आले असून, रुग्णांची एकूण संख्या १० झाली आहे.

राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोमेकॉत खास वॉर्ड सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राणे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती.
या विशेष वॉर्डात म्युकरमायकोसिसची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एम्सने निश्‍चित केलेल्या उपचार पद्धतीनुसार म्युकरमायकोसिसची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या वॉर्डात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

म्युकरमायकोसिसचे नवे ३ रुग्ण
राज्यात म्युकरमायकोसिसची बाधा झालेले आणखी नवे ३ रुग्ण आढळून आले असून, म्युकरमायकोसिसची बाधा झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. म्युकरमायकोसिसची बाधा झालेल्या ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर नव्याने आढळून आलेल्या ३ रुग्णांवर उपचाराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.