राज्यात उद्यापासून पुन्हा ‘लस महोत्सव’

0
110

>> जलद लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय; ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १६८ केंद्रांवर सुविधा

राज्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणात वाढ करण्यासाठी येत्या बुधवार दि. २६ मेपासून ‘लस महोत्सव २.०’ चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लस महोत्सवात पंचायत आणि पालिका क्षेत्रातील १६८ ठिकाणी खास शिबिरांतून कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. कोरोनाची पहिली लस न घेतलेल्या नागरिकांनी या लस महोत्सवात सहभागी होऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले.

राज्यात कोरोना लसीकरणाला ४५ वर्षांवरील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने लस महोत्सवासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करावे लागत आहे. येत्या दि. २६ मेपासून दि. ७ जूनपर्यंत पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रातील १६८ ठिकाणी लस महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. आरोग्य खात्याच्या नेहमीच्या केंद्रात देखील लसीकरण सुरू राहणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींकडून घोर निराशा
राज्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण १०० टक्के झालेले नाही. या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी पंचायत क्षेत्रातील सरपंच, पंच सदस्य, नगरपालिका क्षेत्रातील नगराध्यक्ष, नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर आणून त्यांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा लस महोत्सवाचे आयोजन करावे लागत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांगितले.

लसीकरण शिबिरांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
या महोत्सवानंतर काही सेवाभावी संस्था, ग्रामपंचायती, नगरपालिका यांना लसीकरण शिबिर आयोजित करायचे असल्यास त्यांनी आरोग्य खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
दिव्यांग, जीवरक्षक, औषध उत्पादकांना प्राधान्य
औषध उत्पादन आणि पुरवठा प्रक्रियेतील कर्मचारी, दिव्यांग, पर्यटन खात्याचे जीवरक्षक यांना कोविड फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांना लसीकरणासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

१८ ते ४४ वयोगटासाठी
लवकरच लस

१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा नवीन कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी हल्लीच उपलब्ध करण्यात आलेली लस गेल्या सहा दिवसांत नोंदणी केलेल्या नागरिकांना देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

लस महोत्सवात पहिला डोस घेणार्‍यांना प्राधान्य
या लस महोत्सवाला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न घेतलेल्या नागरिकांनी उपस्थिती लावावी. त्यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना नियमानुसार लवरकच दुसरा डोस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठांसाठी पुरेशा लसी उपलब्ध : डॉ. बोरकर

राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसींची कमतरता नाही. सुमारे २ लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत. राज्यात आत्तापर्यत ९५ हजार ८२० जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. बुधवार दि. २६ मेपासून १० दिवस पंचायत पातळीवर लस महोत्सव होणार आहे. या लसीकरणासाठी स्थानिक सरपंच, पंच सदस्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. राज्यात यापूर्वी आयोजित पंचायत पातळीवरील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला होता, असेही त्यांनी सांगितले.