मृत्यूसत्र थांबेना; आणखी ३८ बळी

0
107

>> गोमेकॉत सर्वाधिक मृत्यू; सक्रिय रुग्णसंख्या १६,२७८ वर

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. गेल्या २४ तासांत आणखी ३८ रुग्णांचा बळी गेला असून, नव्या १४०१ रुग्णांची नोंद झाली आहे, तर २३६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या २,४२१ एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार २७८ झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत इस्पितळांमधून १४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात मे महिन्यात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. २४ तासांत आणखी ३८ रुग्णांचा बळी गेला आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये २५ रुग्णांचा मडगाव येथील दक्षिण गोवा इस्पितळात ८ रुग्णांचा, दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात २ रुग्णांचा आणि उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कुडतरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १ बळीची नोंद झाली आहे. मृतांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या ४ रुग्णांचा समावेश आहे.

नवे १४०१ रुग्ण
राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३१ ते ३५ टक्क्यांवर आले आहे. गेल्या चोवीस तासांत नवे १४०१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या ३९६३ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील ३५.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

मडगाव परिसरात सर्वाधिक रुग्ण
मडगाव परिसरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १५८८ एवढी आहे.

२४ तासांत १६५ इस्पितळात
गेल्या २४ तासांत नव्या १६५ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यात इस्पितळात दाखल होणार्‍या रुग्णांच्या संख्येचे प्रमाण थोडे कमी झाले आहे.

२३६२ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोना बाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात आणखी २३६२ कोरोनाबाधित रुग्ण काल बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ होत आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २९ हजार १६२ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.३५ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन १२३६ रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.