मोदी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर खाणप्रश्‍नी तोडगा

0
110

>> केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही

>> मोदी सरकार पुन्हा येणार असल्याचा केला दावा

केंद्रात नव्याने मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी शक्य ती सगळी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग व नागरी विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. खाण, पर्यटन व मच्छीमारी या तीन उद्योगांवर गोव्याची अर्थव्यवस्था आधारून आहे. त्यामुळे या तिन्ही क्षेत्रांच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत, असेही प्रभू म्हणाले. पाच वर्षांत केलेल्या नेत्रदीपक विकासाच्या बळावर केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

खाण उद्योगावर अवलंबून असलेले लोक हा उद्योग बंद पडल्याने संकटात सापडले आहेत याची आम्हांला कल्पना आहे. केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आम्ही बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी सर्व ते करू, असे प्रभू यांनी यावेळी पुढे बोलताना स्पष्ट केले.
पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता आम्ही खाणी सुरू करणार आहोत. पर्यटन क्षेत्रात इको टुरिझमसारख्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच मच्छीमारी उद्योगाला चालना देण्यासाठी मासळीवर प्रक्रिया करणारे उद्योग गोव्यात सुरू करण्यात येतील, असे प्रभू यांनी सांगितले.

मोपामुळे गोव्याला फायदा
गोव्यात कृषी उत्पादनाला चालना देण्याचीही गरज प्रभू यांनी व्यक्त केली. त्यासाठी शेती व दुग्ध उद्योगाना चालना देण्यात येणार असल्याचे प्रभू यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले.
मोपा येथे होऊ घातलेल्या नव्या विमानतळामुळे गोव्यातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळणार आहे. मोपामुळे गोवा हे रसद केंद्रस्थान (लॉजिस्टिक हब) होणार आहे. त्याचा फायदा गोव्याबरोबरच केरळ, महाराष्ट्र व पश्‍चिम किनारपट्टी असलेल्या अन्य राज्यांनाही मिळणार असल्याचे ते म्हणाले.
गोव्याने केंद्रीय मंत्री या नात्याने माझ्याकडे ज्या ज्या गोष्टींची मागणी केली त्या सगळ्या आपण पुर्‍या केल्या. खास करून रेल्वेमंत्री असताना गोव्याने केलेल्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या. गोव्याने केलेली दर एक मागणी मी पूर्ण केली असल्याचे मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना म्हणायचे, असे प्रभू यांनी यावेळी सांगितले.

पुन्हा एकदा मोदी
सरकार सत्तेवर येणार
नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यापासून मागच्या पाच वर्षांत साधलेला विकास हा नेत्रदीपक असून त्या बळावरच केंद्रात पुन्हा एकदा मोदी यांचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केला.
निवडणूक प्रचारासाठी गेले काही दिवस कित्येक राज्यांचा दौरा केल्याचे सांगून सर्व ठिकाणी मोदी यांचाच बोलबाला असल्याचे प्रभू म्हणाले. नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे प्रधानमंत्री व्हावेत, अशीच लोकांची भावना असल्याचे सर्वत्र दिसून आल्याचे प्रभू म्हणाले.
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशातील महागाई कमी झाली असल्याचा दावा प्रभू यांनी केला. तसेच भारत ही वेगाने वाढणारी आर्थिक महासत्ता होऊ लागली असल्याचेही ते म्हणाले. जगभरातील निर्यातीबरोबरच चीनबरोबरची निर्यातही अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याचे ते म्हणाले.

रेल्वेवर ३ लाख कोटी खर्च
मोदी सरकारच्या काळात भारतात रेल्वेच्या विकासासाठी ३ लाख कोटी रु. खर्च करण्यात आल्याची माहितीही प्रभू यांनी दिली. राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य, जनकल्याण, साधनसुविधा विकास आदी क्षेत्रात भरीव विकास झाल्याचे प्रभू म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची जगाने दखल घेतल्याचे सांगून रशिया, सौदी अरेबिया आदी देशानी त्यांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव केल्याचे ते म्हणाले.

गोव्यात दोन्ही
जागा भाजप जिंकणार
भाजप गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार असल्याचा दावाही प्रभू यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना प्रभू यांनी आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. नाईक यांनी आयुषमंत्री म्हणून चांगले काम केले असल्याचे ते म्हणाले. खासदार नरेंद्र सावईकर यांनीही चांगले काम केलेले असून दोघांनाही पुन्हा संधी मिळायला हवी, असे ते म्हणाले.

पुन्हा एकदा नोटाबंदीची गरज आहे असे वाटते काय, असे पत्रकारांनी विचारले असता काळ्या पैशांच्या विरोधात कशी पावले उचलावीत हे मोदी सरकारने दाखवून दिलेले आहे. काळा पैसा नाहीसा करण्याचे वेगवेगळे उपाय आहेत व ते सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकार अमलात आणणार असल्याचे ते म्हणाले.