मोदींहस्ते ऑगस्टमध्ये मोप विमानतळाचा शिलान्यास

0
88

>>इलेक्ट्रॉनिक सिटी, गोमेकॉ सुपरस्पेशालिटी प्रकल्पांचाही समावेश : मुख्यमंत्री

 

मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ, बांबोळी येथील स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभाग व तुये- पेडणे येथील इलेक्ट्रॉनिक सिटी या तिनही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कोनशिला बसविण्यासाठी गोव्यात येण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले आहे. त्यासाठी १५ ते ३० ऑगस्ट या दरम्यान एक दिवस गोवा भेट निश्‍चित करण्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
वरील प्रश्‍नावर आपण पंतप्रधानांची भेट घेतली होती. गोवा सरकारच्या कार्यक्रमावर व कार्यपध्दतीवर त्यांनी समाधान व्यक्त करून प्रशंसा केल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. ‘ब्रिक्स’ या शिखर परिषदेच्या तयारीवरही आपण मोदी यांच्याशी चर्चा केली. संबंधित असलेल्या खात्यांना पायाभूत सुविधा किंवा अन्य सुविधांसाठी आवश्यक ती मदत करण्याचे ठोस आश्‍वासन पंतप्रधानांनी दिले आहे. त्यामुळे आज संबंधित खात्यांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन अंदाज खर्च तयार करण्यास सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१७च्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरही त्यांच्याशी चर्चा केल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. आम आदमी पक्षाच्या गोव्यातील प्रवेशावरही मोदी यांनी चौकशी केल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेश भाजप अध्यक्षांनी २०१७च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्याच्या तयारी संबंधिचा अहवाल सादर केल्याचे पार्सेकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. पेडणे तालुक्यात आर्थिक सुबत्ता प्राप्त व्हावी या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करीत आहोत. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पेडणे तालुक्यात किमान सात ते आठ तारांकीत हॉटेल्स येण्याची गरज आहे. परंतु आपण कोणताही प्रकल्प जनतेवर लादू शकत नाही, असे पार्सेकर यांनी सांगितले.
रमेश तवडकर यांच्यावर जो गुन्हा नोंद झालेला आहे, तो आमदार काळातील आहे, असे सांगून वरील प्रकरणी आपण तवडकर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. आपण कुणावरही आंदोलन काळात हल्ला केला नव्हता, असे तवडकर यांनी सांगितल्याचे पार्सेकर
म्हणाले.

भाभासुमं’च्या आंदोलनाची दखल नाही
माध्यम प्रश्‍नावरील भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनाची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दखल घेण्यात आली नसल्याचे पार्सेकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. पंतप्रधान कार्यालयातून अनेक पत्रे येतात. त्या पत्रांना नियमितपणे उत्तरे पाठविली जातात. मात्र, माध्यम प्रश्‍नावर पीएओ कार्यालयातून स्पष्टीकरण मागविल्याचे आपल्याला आठवत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.