उत्तरपत्रिका तपासणीच्या घोळाची चौकशी होणार

0
110

>>मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवला; आयटी सेलमार्फतही चौकशी

 

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीतील घोळासंदर्भात नवप्रभेने काल सप्रमाण प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली. असंख्य विद्यार्थी, प्राध्यापक व पालकांनी आवर्जून संपर्क साधून गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचा हलगर्जीपणा उजेडात आणल्याबद्दल नवप्रभेला धन्यवाद दिले. शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पदाधिकार्‍यांनीही या सार्‍या प्रकाराची गंभीर नोंद घेतली असून मंडळाचे उपाध्यक्ष श्री. गुरू पावसकर आज अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांच्यासमवेत बैठकीत एकूण प्रकाराचा आढावा घेणार आहेत. शालांत मंडळावर चार सदस्य प्रतिनिधित्व करीत असलेल्या गोवा प्राचार्य संघटनेनेही या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी बैठक घेण्याचे ठरवले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या घोटाळ्याविषयी अहवाल मागवून घेणार असल्याचे पत्रकारांना सांगितले; तर शिक्षण खात्याच्या सचिवांनी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे चौकशीचे आदेश दिले आहेत.

शालांत शिक्षण मंडळाने यावर्षी फेरमूल्यांकनाची यादी मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केल्याने उत्तरपत्रिका तपासणीतील गफलतींचे बिंग फुटू शकले. फेरमूल्यांकनाची जी दुसरी यादी मंडळाच्या संकेतस्थळावर दर्शविण्यात आली आहे, त्यात असंख्य विद्यार्थ्यांना फेरमूल्यांकनानंतर काही विषयांत थेट दहा ते वीस गुण वाढल्याचे स्पष्ट झालेे. सर्वाधिक गुणवाढ इंग्रजी विषयात करावी लागली आहे. इंग्रजी विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये मोठा फरक पडला आहे. अंकित गावकर या मुलाचे १८, पूजा गोसावी हिचे १६ गुण वाढले. १५ व त्या खालील गुणवाढ झालेल्या मुलांची संख्या मोठी आहे. इंग्रजी खालोखाल मानसशास्त्र विषयातही अशाच प्रकारे मोठी गुणवाढ झाल्याचे दिसून आले असून ह्रषिकेश दाभेकर या विद्यार्थ्याला त्या विषयात चक्क २२ गुण वाढले आहेत. इतर विषयांमध्येही पुनर्मूल्यांकन मागणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणांत असाच मोठा फरक पडला आहे. पदार्थविज्ञानशास्त्रात फेरमूल्यांकन मागणार्‍या अश्‍वथीकुमार या मुलाला तब्बल २३ गुण वाढवून मिळाले आहेत.
पुनर्मूल्यांकन मागणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये एवढी गुणवाढ दिसून आल्याने ज्यांनी पुनर्मूल्यांकन मागितले नव्हते, अशा विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष धुमसत असून आपल्यालाही पुनर्मूल्यांकनाची संधी मिळाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे. शालांत शिक्षण मंडळाच्या या हलगर्जीपणाची शिक्षणमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी व पालकांनी केली.

इंग्रजी विषयात सर्वाधिक घोळ
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत सर्वाधिक घोळ इंग्रजी विषयात झाला असून गेली दोन वर्षे हा प्रकार दिसून येत असल्याचे शालांत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले. यासंबंधी मंडळाचे पदाधिकारी लवकरच एकत्र येऊन झाल्या प्रकाराचा आढावा घेणार असून कोणत्या उत्तरपत्रिका तपासणीत गलथानपणा झाला याची माहिती घेणार असल्याचे त्याने सांगितले. यावर्षी विद्यार्थ्यांच्या फेरमूल्यांकनाची यादी संकेतस्थळावर घातल्याने या प्रकाराची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना सर्वांना आली असेही सदर पदाधिकार्‍याने सांगितले. शालांत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांचा चार वर्षांचा कार्यकाळ या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी संपत असून बारावीच्या निकालातील घोळामुळे त्यांच्या कारकिर्दीलाही निष्कारण कलंक लागला आहे.
शालांत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे असंख्य विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला असून गुणवाढीनंतर टक्केवारीतही मोठा फरक पडत असल्याने शाळांच्या गुणवत्ता याद्यांमध्येही चढउतार झाले आहेत. शाळेत पहिला आल्याचे घोषित झालेल्या मुलाचे स्थान दुसरा आलेल्या मुलाने पटकावण्याचे प्रकारही घडले आहेत. या प्रकारामुळे ही मुले व्यथित झाली असून आपल्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ मांडला गेल्याची त्यांची भावना झाली आहे. पर्वरी येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या उत्तरपत्रिकेत एका विषयात तिला प्रत्येक प्रश्नाला चारपैकी अडीच गुण देण्यात आल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. सगळ्याच प्रश्नांना प्रत्येक वेळी अडीच गुण कसे काय दिले जाऊ शकतात असा सवाल या पालकाने केला.
संगणकाधारित उत्तरपत्रिका तपासणी सदोष असल्याचा दावा एका प्राध्यापकाने केला. आपण सर्व उत्तरपत्रिका तपासून ऑनलाइन नोंद केली असता काही वेळानंतर त्यातील बर्‍याच उत्तरपत्रिका तपासल्या नसल्याचे सॉफ्टवेअरवर दिसू लागले. पुन्हाही तोच प्रकार निदर्शनास आल्याचा दावा त्याने केला. उत्तरपत्रिका तपासणार्‍या सर्व प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीचे प्रशिक्षण दिले गेलेलेच नव्हते. केवळ काही शिक्षकांनाच हे प्रशिक्षण मिळाले होते अशी माहितीही मिळाली आहे.
विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना केवळ शालांत शिक्षण मंडळाच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना का, असा सवाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते ह्रषिकेश शेटगावकर यांनी केला. सरकारने या संबंधी चौकशीसाठी समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली.

दहावीच्या पेपर तपासणीबाबतही संशय
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीतील घोळ फेरमूल्यांकनाची दुसरी यादी इंटरनेटवर प्रसिद्धीस दिल्याने उजेडात आल्याने दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसंबंधीचा तपशीलही अशाच प्रकारे इंटरनेटवर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पुढे आली आहे. यंदा दहावी – बारावीचा निकाल नव्वद टक्क्यांच्या पुढे का गेला, याचे रहस्यही या विषयाच्या सखोल चौकशीतून उलगडेल असे काही पालकांचे म्हणणे आहे.

अहवाल मागवणार: मुख्यमंत्री
बारावीच्या परीक्षेच्या पेपरतपासणीत निर्माण झालेल्या गोंधळावर आपण अहवाल मागवून घेणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे अशा संस्थांच्या कारभारात आपण हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र, दै. नवप्रभात प्रसिद्ध झालेले वृत्त आपल्या वाचनात आले. त्यामुळे आपण मंडळाकडून अहवाल मागवून घेण्याचे ठरविले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

फेरमूल्यांकनात मुलांवर गुणांचा पाऊस!
एकापेक्षा अनेक विषयांत फेरमूल्यांकन मागितलेल्या विद्यार्थ्यांवर तर वाढीव गुणांचा पाऊसच पडला आहे. एका विद्यार्थिनीने इंग्रजी व मानसशास्त्र विषयात फेरमूल्यांकन मागितले होते. तिला फेरमूल्यांकनात या दोन विषयांत मिळून २७ गुणांची भेट मिळाली आहे. म्हणजेच केवळ दोन विषयांच्या फेरमूल्यांकनामुळे तिच्या टक्केवारीत साडे चार टक्कयांची भर पडली आहे. अन्य एका विद्यार्थ्याला याच दोन विषयांत फेरमूल्यांकनानंतर ३० गुण वाढवून मिळाले आहेत. म्हणजे एकूण सहा विषय गृहित धरता त्याची गुणांची सरासरी केवळ या दोन विषयांतील गुणवाढीमुळे पाच टक्क्यांनी वाढली. अश्वथीकुमार या विद्यार्थ्याला पदार्थविज्ञान विषयात २१ गुण मिळाले होते. फेरमूल्यांकनात त्याला जवळजवळ दुप्पट म्हणजे ४४ गुण दिले गेले आहेत. मनमित तिंबले या विद्यार्थ्याला ५५ गुण मिळाले होते. त्याला फेरमूल्यांकनात तब्बल ७७ गुण मिळाले. ऍनाली निशा डिसोझा या विद्यार्थिनीला जीवशास्त्रात २६ गुण दिले गेले होते. फेरमूल्यांकनात तिला ४० गुण मिळाले आहेत. मूळ उत्तरपत्रिका तपासणी नीट झाली नव्हती याचे हे ढळढळीत पुरावे आहेत. संगणकावर फेरतपासणी करताना परीक्षकांना आधीचे गुण दिसत नाहीत. त्यामुळेच निष्पक्षपणे फेरमूल्यांकन होऊ शकले व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला.