मोदींच्या वाढदिवसानिमित्त आजपासून राज्यभर कार्यक्रम

0
34

>> भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज दि. १७ सप्टेंबर रोजी ७१ वा वाढदिवस भाजपने देशपातळीवर साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर हे तीन आठवडे या दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त गोव्यातही विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
मोदी यांच्या वाढदिवसासोबतच पं. दीनदयाळ उपाध्याय, तसेच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे तानावडे यांनी सांगितले. यासाठी पक्षाने विविध समित्यांची स्थापना केली आहे.

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहीम, तसेच रेशन बॅगांचेही वाटप केले जाणार असल्याचे तानावडे म्हणाले.

दामू नाईक समन्वयक
या मोहिमेचे गोव्यातील समन्वयक म्हणून माजी आमदार व पक्षनेते दामू नाईक यांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्त माध्यमांवर चर्चात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची जबाबदारी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांचयाकडे सोपवली आहे.

राज्यपालांकडून वृद्धाश्रमांना आर्थिक मदत
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मोदी यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या. तसेच या प्रसंगी ७१ अनाथालये आणि ७१ डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदतीची घोषणा केली. राज्यपालांनी ७१ व्यक्तींना डायलिसिस उपचारांसाठी राज्यपालांच्या डिस्क्रेशनरी फंडातून आर्थिक मदत घोषित केली.

पंतप्रधान मोदी उद्या साधणार
आरोग्य कर्मचार्‍यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवार दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कोविड लस लाभार्थींमध्ये समाविष्ट असलेल्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांशी ऑनलाइन संवाद साधतील. पंतप्रधानांचा ऑनलाईन संवाद गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य व्याख्यान सभागृह, रवींद्र भवन, मडगाव, सांगे नगरपालिका सभागृह, राजीव कला मंदीर, फोंडा, साखळी पालिका सभागृह, जुने आझिलो इस्पितळ सभागृह म्हापसा येथे थेट दाखविला जाईल. वरील प्रमुख ठिकाणांशिवाय राज्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये संवाद थेट दाखविला जाईल.