सिद्धी नाईकप्रकरणी पोलीस-डॉक्टर आमनेसामने

0
36

>> डॉक्टरांनी दिशाभूल केल्याचा पोलिसांचा आरोप

>> मृत्यूचे कारण पोलिसांनी शोधण्याचे डॉक्टरांचे आवाहन

कळंगुट येथील समुद्र किनार्‍यावर मृतावस्थेत सापडलेल्या सिद्धी नाईक हिच्या शवचिकित्सा अहवालानंतर तिचा मृत्यू हा आत्महत्त्येचा प्रकार आहे असे जाहीर करण्यात आले होते. त्यावरून आता पोलीस व डॉक्टरांनी एकमेकांना दोष देण्यास सुरूवात केली आहे.

डॉ. वाइसमन पिंटो यांच्या नेतृत्त्वाखालील तीन सदस्यीय तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने गेल्या मंगळवारी गोमेकॉच्या डिनना सादर केलेल्या अहवालात सिद्धी नाईक हिचा मृत्यू हा पाण्यात बुडाल्यामुळे झाला असल्याचे म्हटले आहे. समुद्रात सिद्धी नाईक ही कशी बुडाली हे पोलिसांनी शोधून काढण्याची गरज असल्याचे या समितीने म्हटले आहे.
दरम्यान, सिद्धी नाईक हिच्या शवचिकित्सेची पाहणी केलेले डॉक्टर आंद्रे फर्नांडिस यांनी सिद्धी नाईक हिचा मृत्यू ही आत्महत्त्या असल्याचे डॉक्टरांनी अहवालातून म्हटले नव्हते असे काल स्पष्ट केले. डॉक्टरांनी सिद्धी नाईक हिचा व्हिसेरा का जपून ठेवला नाही असा प्रश्‍नही आता तज्ज्ञ मंडळी उपस्थित करीत आहेत. सिद्धी नाईक हिच्या मृतदेहावर ओरखडे होते. तसेच अंगावरील कपडेही गायब होते. या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांशी चर्चा करुन व्हिसेरा जपून ठेवायला हवा होता, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या पार्श्‍वभूमीवर आता पोलिसांनीही डॉक्टरांच्या पथकाला दोष देण्यास सुरूवात केली असून मृत्यूचे कारण देताना शवचिकित्सा केलेल्या डॉक्टरांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
दरम्यान, सिद्धी नाईक हिच्या कुटुंबीयांनी पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षकांना एका पत्रात सिद्धीच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नुकतीच केली आहे. याप्रसंगी बोलताना सिद्धीचे वडील संदीप नाईक यांनी, सिद्धी हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी योग्य प्रकारे तपास काम केले नसल्याचा आरोपही केला आहे.

दि. १२ ऑगस्ट रोजी कळंगुट समुद्र किनार्‍यावर सिद्धी नाईक हिचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला होता. मात्र अद्यापपर्यंत सिद्धी नाईक हिचा मृत्यू कसा झाला? तिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली याचा ठोस तपास अजूनही पोलिसांना लावता आलेला नाही.