मैदानी खेळ खेळा अन्‌‍ आरोग्य कमवा

0
22
                                                                                 
  • डॉ. मनाली महेश पवार

दिवसभराच्या या अशा कार्यक्रमात शारीरिक हालचालींना कुठे जागा तरी उरते का? काही जादा उत्साही पालक दिवसभराच्या शाळा, शाळेचे क्लास, इतर क्लास व परत रात्रीसुद्धा स्पेशल क्लासला पाठवणारेसुद्धा आहेत. या सर्व कृत्रिम जीवनशैलीचा, घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या जीवनाचा दुष्परिणाम मात्र मुलांच्या आरोग्यावर सातत्याने होत राहतो.

शाळेतून आल्यावर गृहपाठ केला व त्यानंतर संध्याकाळी साधारण एक ते दोन तास खेळायला धूम ठोकली, अशीच सर्वसाधारणपणे शाळकरी मुलांची पूर्वी जीवनशैली होती व याला कुणीच अपवाद नसायचा. आणि ते खेळ म्हणजे नुसते बैठे खेळ नसून सर्व ऋतूंमधील मैदानी खेळ असायचे. पाऊस-ऊन-थंडी या कशाचीच त्यांना पर्वा नसायची. धावणे, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, रिंगानी, लगोरी आणि क्रिकेटपासून सगळे खेळ घरातल्याच पटांगणात खेळायचे. त्यामुळे वेगळा व्यायाम करायची गरजच नसायची. लठ्ठपणासारखे आजार नसायचे की अपचन, अजीर्णसारखी तक्रार नसायची. आजची मुलं खेळतच नाहीत. जी खेळतात ती स्पर्धेपुरतीच. खेळ स्वतःच्या व्यायामासाठी, आनंदासाठी, आरोग्यासाठी नसून स्पर्धेसाठी, कौतुकासाठी, नावासाठी खेळले जात आहेत. त्यामुळे आजकाल अगदी मोजकीच मुलं एखादा खेळ खेळताना दिसतात.

आपल्या पाल्याची सर्वांगीण वाढ व्हावी असे प्रत्येक पालकाला वाटते आणि त्यासाठी ते प्रयत्नही करतात. पण आपली जीवनशैली एवढी व्यस्त झाली आहे की आपण त्याच्याशी जुळवून घ्यायला कमी पडत आहोत. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा तर जणू पाचवीलाच पुजलेली आहे. सगळीकडे जीवघेणी स्पर्धा. या सगळ्यामध्ये नेमके काय करावे हे ना पाल्याला कळत, ना पालकांना! प्रत्येकाची गुणवत्ता यादीत येण्याची चुरस. प्रत्येकाचा भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न असतो. याचा अप्रत्यक्ष परिणाम खेळण्यावर होतो. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त उरलेल्या वेळात जादा कोचिंग क्लासेसमध्येच मुलांचा पूर्ण दिवस संपतो. शिवाय गणित, इंग्रजी आदी शालेय विषयांचे क्लास आहेतच. त्याचबरोबर संगीताचा क्लास, नृत्याचा क्लास… दुसऱ्यांची मुले स्पर्धेत टीव्हीवर दिसली की प्रत्येकालाच आपले मूल तिथेही हवे असे वाटायला लागते. इथेही मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळायला वेळ नाहीच. त्याचबरोबर सगळ्यांनाच आपली मुलं फाडफाड इंग्रजी बोलायला हवीत असे पालकांना वाटते. अशी शाळाही दूर असते. गाडीने येणे आणि जाणे. त्यामुळे मुले गावातल्या शाळेतही नाहीत व त्यांचे चालणेही होत नाही!
अशा या बंदिस्थ व बिघडलेल्या वेळापत्रकामुळे बिचारी मुले मैदानी खेळाकडे कुठे वळणार? आपल्या विरंगुळ्यासाठी टीव्हीचे कार्यक्रम, मोबाईलचे गेम, मोबाईल पाहण्यातच बिझी होतात व पसंत करतात. पालकही थकलेले असतात. त्यामुळे विरंगुळा म्हणून त्यांना प्रोत्साहन देतात.
दिवसभराच्या या अशा कार्यक्रमात शारीरिक हालचालींना कुठे जागा तरी उरते का? काही जादा उत्साही पालक या दिवसभराच्या शाळा, शाळेचे क्लास, इतर क्लास व परत रात्रीसुद्धा स्पेशल क्लासला पाठवणारेसुद्धा आहेत. या सर्व कृत्रिम जीवनशैलीचा, घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या जीवनाचा दुष्परिणाम मात्र मुलांच्या आरोग्यावर सातत्याने होत राहतो. अशी मुलं जास्त सुस्त होतात.

त्यातही आर्थिक सुबत्ता चांगली असेल तर मग पाहायलाच नको. पालक मग अतिपौष्टिक खाण्याचा मुलांवर मारा करतात. त्यातच अति तेलात तळलेला मांसाहार, चीज, बटर, पनीरसारखे पचायला जड पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड इत्यादी मुलांना जास्त आवडते. पण हा असा पचण्यास जड आहार सेवन करण्यामुळे पचविण्यासाठी लागणाऱ्या व्यायामाच्या अभावामुळे त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसून लागतात.
शालेय जीवनापासूनच मुलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढलेले दिसते. या लठ्ठपणाचे अनेक शारीरिक व मानसिक दुष्परिणाम मुलांवर लहानपणापासूनच दिसायला लागतात. लठ्ठपणामुळे शरीरामधील हार्मोन्सचे असंतुलन होते, इन्सुलिनसारखी संप्रेरके अधिक प्रमाणात उत्पन्न होतात. परिणामी वयात येण्यासाठी लागणारी संप्रेरके लहान वयातच मुलांमध्ये वाढू लागतात व मुलांमध्ये अकाली पौगंडावस्था येताना दिसते.

या लठ्ठपणामुळे या मुलांना लहान वयातच मधुमेहासारख्या कष्टसाध्य व्याधी जडतात. मुले लवकर वयात येतात व त्यामुळे त्यांची उंची खुंटते. मुलींच्या बाबतीत हे जास्त प्रकर्षाने जाणवते. या लठ्ठपणामुळे बुद्धीवर तमाचे आवरण येते व मुलांच्या एकाग्रतेवर व स्मरणशक्तीवर परिणाम होतो. मुले निरुत्साही बनतात.
खेळाचे महत्त्व काय?

  • आयुर्वेदशास्त्राप्रमाणे 72 रोगांवर एकच औषध आहे आणि ते म्हणजे व्यायाम.
  • व्यायामामुळे (खेळांमुळे) लठ्ठपणा कमी होतो आणि लठ्ठपणामुळे निष्पन्न होणारे दुष्परिणाम मग आपोआपच टळतात व मुलांची सर्वांगीण वाढ होते.
  • खेळांमुळे रुधिराभिसरण प्रक्रिया चांगली होते. पेशींना ऑक्सिजन, अन्न व संप्रेरकांचे वाटप व्यवस्थित होते.
  • खेळ खेळल्याने शरीराचा सर्वांग सुंदर व्यायाम होतो.
  • मोकळ्या मैदानी खेळांना विशेष प्राधान्य द्यावे. उदा. धावणे, दोरीच्या उड्या मारणे, खो-खो, टेनिस इ. खेळ कोणत्याही वेळेला खेळावा. दिवसा वेळ मिळेल तसा खेळावा. टीव्ही, मोबाईलमध्ये वेळ वाया घालवू नका. खेळाच्या रूपाने आपल्या शरीराचा व्यायाम करावा व वेळेचा योग्य रीतीने विनियोग करावा, ज्याने आपले आरोग्य उत्तम राहते. शारीरिक व मानसिक वाढ संतुलित होते. तहान लागल्यावर विहीण खणू नये. म्हणजे साधारण सतरा-अठरा वर्षांचं वय उलटून गेल्यावर हे खेळ व्यायाम म्हणून उंची वाढवण्यासाठी खेळल्यास त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणूनच पहिल्यापासूनच खेळाच्या रूपाने व्यायाम केल्यास उंची वाढते व बांधा सुडौल बनतो.
    आजकाल सर्वच गोष्टींमध्ये- ‘क्रॅश कोर्स’चे फॅड आहे. याला व्यायामही (खेळ) अपवाद नाही. सुटीच्या काळामध्ये 15 दिवसांची व्यायामाची (खेळांची) शिबिरे सर्वत्र पाहायला मिळतात. एखादा महिना विशेष खेळ खेळून उंचीही वाढत नाही व स्थूलताही कमी होत नाही, हे सत्य आहे. अशा प्रकारचा व्यायाम शरीराला अपायकारक ठरू शकतो.

मुलांच्या योग्य वाढीसाठी व निरोगी आरोग्य राखण्यासाठी हार्मोन्सचे बॅलन्स असणे खूप महत्त्वाचे असते. संप्रेरकांचा विकार झाला तर मुले खुजी राहतात व त्यांच्या वाढीचा वेग मंदावतो. नैसर्गिक वाढीसाठी जी संप्रेरके असतात ती सर्व संप्रेरके मुलांच्या शरीरात नैसर्गिकरीत्याच तयार होत असतात. परंतु संप्रेरकांचा स्राव नियमित होण्यासाठी व्यायामाची (खेळांची) आवश्यकता आहे. व्यायामामुळे ग्रोथ हार्मोन्सची उत्पत्ती होते. या ग्रोथ हार्मोन्समुळे हाडांची लांबी वाढते व मुलांची उंची वाढायला मदत होते. व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणाबरोबर शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते व भविष्यात मधुमेहाचा धोका जास्त संभवतो. मुलींच्या बाबतीत मुली स्थूलपणामुळे लवकर वयात येतात. म्हणून हे आजार टाळण्यासाठी मुलांनी लहानपणापासूनच खेळणे किती गरजेचे आहे हे लक्षात येते.

मैदानी खेळाच्या अभावामुळे आरोग्य बिघडते. लहान वयामध्ये या आजारांची सुरुवात होते व याचे परिणाम पूर्ण आयुष्यभर भोगावे लागतात. त्यामुळे शिक्षणाबरोबरच खेळाचे महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे मुलांना प्रोत्साहन देणे पालकांबरोबरच सरकारचेही कर्तव्य आहे.
मुलांना व्यायामात, खेळांत गोडी निर्माण करणे काळाची गरज आहे. सरकारने मुलांना मैदानी खेळ खेळण्याची संधी उपलब्ध द्यावी व त्यांच्या निरोगी शारीरिक वाढीला हातभार लावावा. म्हणूनच म्हणावेसे वाटते- मैदानी खेळ खेळा, आरोग्य कमवा!