मेळावलीत प्रवेश करणार्‍या दहाजणांना अटक

0
226

>> पोलिसांकडून सर्व रस्ते बंद

>> आयआयटी विरोधक संघटित

>> १५ पोलीस जखमी

मेळावली सत्तरीत अजूनही तणावाचे वातावरण असून आयआयटी विरोधक आणखी संघटित झाले आहेत. काल शुक्रवारी पोलिसांनी मेळावलीत जाणारे सर्व रस्ते बंद केले. वाळपईत मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी खोतोडेमार्गे मेळावलीत जाणार्‍या रस्त्यावर तसेच गुळेलीतून मेळावलीत जाणार्‍या रस्त्यांवर तपास सुरू केल्यामुळे मेळावलीत बाहेरील लोकांना जाता आले नाही. मेळावलीत जाणार्‍या दहा जणांना पोलिसांनी अटक करून वाळपई पोलीस स्थानकांवर आणले.

दिगंबर कामत मेळावलीत
मेळावली आयआयटी विरोधकांचे आंदोलन तीव्र झाले असून ते आता राज्यव्यापी आंदोलन होत आहे. गुरुवारी रात्री विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, वाळपई कॉंग्रेस अध्यक्ष दशरथ मांद्रेकर यांनी वाळपई पोलीस स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस पदाधिकारी व मेळावली नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्यावेत, मेळावलीतून पोलीस फौजफाटा मागे घ्यावा अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी मेळावलीतील आयआयटी विरोधकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आयआयटी आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. यावेळी कामत यांनी, कोणत्याही स्थितीत आयआयटी आंदोलकांवर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले.

वाळपई कॉंग्रेसकडून निषेध
वाळपई कॉंग्रेसने काढलेल्या पत्रकात वाळपई अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, महिला अध्यक्ष रोशन देसाई, गोवा प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर सरचिटणीस जनार्दन भंडारी व रणजित राणे तसेच मेळावलीवासीयांवर गुन्हे दाखल केल्याबद्दल सरकारचा निषेध केला. मेळावलीवासीयांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नसल्याचे सरचिटणीस नंदा कोपार्डेकर यांनी सांगितले.

विश्वेश परोब इस्पितळात
अटक करण्यात आलेल्या विश्वेश परोब यांच्यावरील सुनावणी काल दुपारी जिल्हा सत्र न्यायालयात झाली.न्यायालयाने निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला. विश्वेश यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इस्पितळात दाखल केले आहे.

दहाजणांना ताब्यात
दरम्यान, काल दिवसभरात या भागात प्रवेश करण्यासाठी जाणार्‍या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आंदोलनात मेळावलीवासीयांना धामसेवासीयांनीही पाठिंबा व्यक्त केला आहे. तर मुरमुणे येथील जंगलात कालही सुमारे सातशे आयआयटीविरोधक शांततेने आंदोलन करण्यासाठी उपस्थित होते.
दरम्यान, गुरूवारी वॉरंट काढलेल्यांपैकी कुणालाही काल उशिरापर्यंत अटक केली नव्हती. दिवसभर गुळेली येथे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक महेश गडेकर, उपनिरीक्षक प्रणित मांद्रेकर, प्रसाद पाळणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

हे भाजपचे कारस्थान ः वेलिंगकर
आंदोलनासंदर्भात काल माझा मुलगा शैलेंद्र वेलिंगकर यास अटक करून गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक शोभित सक्सेना यांनी त्यांच्या कार्यालयातच मारहाण केली. ही घटना आपण जिल्हा न्यायालयात जामीन सुनावणीवेळी वकिलांतर्फे न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले. ही अटक म्हणजे भाजपचे सूडाचे कारस्थान आहे. जामीन मिळू नये आणि रिमांड मिळवून कस्टडीत मारहाण करण्याचा भाजपचा इरादा असल्याचा आरोप शैलेंद्रचे वडील तथा गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे.
शेळ-मेळावली येथे आय्‌आय्‌टी प्रकल्पाच्या विरोधात लोकशाही मार्गाने शांततापूर्णरित्या आंदोलन करणार्‍या आंदोलनकर्त्यांवर खुनाच्या प्रयत्नाचे कलम लावून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न हा दुर्दैवीच नसून लज्जास्पदही असल्याचे गोसुमंचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आंदोलकांनीच मुख्यमंत्र्यांशी
चर्चा करावी : तानावडे

आय्‌आय्‌टी प्रकल्पाबाबत स्थानिक लोकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आता शेळ मेळावलीला जाणार नसून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची असल्यास तेथील आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, असे गोवा भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. मेळावलीत पोलिसांवर हल्ला केलेल्यांवर जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेेणार नाही. बाहेरचे लोक येऊन शेळ मेळावली येथील लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही तानावडे यांनी केला.