बुधवारच्या धुमश्‍चक्रीत १५ पोलीस जखमी

0
211

शेळ मेळावली येथे ६ जानेवारीला आयआयटी विरोधक आणि पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षात १५ महिला पोलीस जखमी झाल्याचे पोलीस खात्याने काल जाहीर केले. आयआयटी संकुलाच्या जागेचे सीमांकनाच्या वेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले.
पोलीस खात्याने ह्या घटनेच्या दोन दिवसांनंतर जखमी झालेल्या १५ महिला पोलिसांची नावे जाहीर केली आहेत. त्यात आयआरबीतील ११ महिला पोलीस, डिचोली पोलीस स्थानिकातील ३ महिला पोलीस आणि हणजूण पोलीस स्टेशनवरील १ महिला पोलिसांचा समावेश आहे. पोलीस खात्याने आयआयटी संकुल विरोधकांच्याविरोधात भा.द.स.च्या ३०७, ३२३,३२४, ३२५, ३२६ व इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

आंदोलकांनी भेटण्यास यावे ः मुख्यमंंत्री
शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जागेच्या प्रश्‍नावरून लोकांना त्रास झालेला नको आहे. या प्रश्‍नी स्थानिकांनी आपणाला भेटायला यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले.
शेळ मेळावली येथील आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विश्‍वेश परोब यांनी जामिनासाठी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे.
तसेच, डायना तावारिसने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. या दोन्ही अर्जांवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आणखी एकास अटक
गुन्हा अन्वेषण विभागाने शेळ मेळावली येथील हिंसाचारप्रकरणी आणखी एका संशयिताला काल अटक केली. या प्रकरणी आत्तापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. कल्पेश गावकर असे अटक केलेल्याचे नाव आहे. कल्पेश गावकर यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.