मेळावलीत आयआयटीसाठी ठाम ः मुख्यमंत्री

0
218

राज्य सरकार शेळ मेळावली सत्तरी येथे आयआयटी संकुल उभारण्याबाबत ठाम आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.
मेळावली गुळेली येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेकडून करण्यात येणारे जमीन आखणी करण्याचे काम बंद पडलेले आहे.

राज्य सरकारने मेळावली गुळेली येथील आयआयटी संकुलाबाबत फेरविचार केलेला नाही. नियोजित जागेत आयआयटी संकुल उभारले जाणार आहे. आयआयटी व्यवस्थापनाच्या ताब्यात जागा देण्यात आलेली आहे. सध्या जागेची आखणी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून सदर काम लवकर पूर्ण करण्याची सूचना संबंधितांना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आयआयटी संकुलात येणार्‍या जमीनप्रश्‍नी योग्य तोडगा काढण्याचे आश्‍वासन संबंधितांना देण्यात आलेले आहे. आपण स्वतः जागेची पाहणी केली आहे. आयआयटी संकुलाच्या क्षेत्रात येणार्‍या जमीनदारांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही. जमीनप्रश्‍नी योग्य तोडगा काढला जाणार आहे. आंदोलन करणार्‍यांसोबत चर्चा करण्याची तयारी असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

१०वी, १२ वीच्या फक्त
अंतिम परीक्षा ऑफलाइन

गोवा शालान्त मंडळाच्या दहावी, बारावी, गोवा विद्यापीठ आणि व्यावसायिक महाविद्यालयाच्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यास मान्यता दिली आहे. इतर सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याची सूचना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.