मुसळधार पावसाने गोव्याला झोडपले

0
128

राज्याला जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाने काल पुन्हा एकदा झोडपून काढले असून ठिकठिकाणी झाडांची पडझड होऊन नुकसान होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. वेर्णा येथे मुख्य रस्त्यावर एका कारवर झाड कोसळल्याने चालकाचे निधन झाले आहे. राज्यभरात मागील चोवीस तासात ४.६० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात संततधार पाऊस सुरू असल्याने मोसमी पावसाने इंचाचे शतक पूर्ण केले आहे. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ९८.२० इंच पावसाची नोंद झाली होती.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे जोरदार वारे आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. हवामान विभागाने गुरूवारपर्यंत काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

जोरदार वारे आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. घरे, रस्ता व इतर ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. पणजी शहरात १५ पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे. काही भागात विजेच्या खांबांची नासधूस तसेच तारा तुटल्याने वीज खंडित झाली.