Home बातम्या मुरगाव वारकरी संस्थेच्या वारीच्या अर्जांचे वितरण

मुरगाव वारकरी संस्थेच्या वारीच्या अर्जांचे वितरण

0

गुढीपाडव्याच्या शुभमुुहुर्तावर हेडलॅण्ड सडा येथील मुरगाव वारकरी संस्था, संभाजीनगरतर्फे तिसऱ्या पंढरपूर वारीच्या अर्ज वितरणाला सुरुवात बामणवाडी येथील श्री ब्रह्मेश्वर मंदिरात करण्यात आली.

हेडलॅण्ड सडा येथील मूरगाव वारकरी संस्थेतर्फे 2024 पासून आषाढी एकादशीप्रीत्यर्थ पंढरपूर पायी वारीला 55 माऊलींनी सुरुवात केली होती. पहिली वारी इच्छेनुसार झाल्यानंतर मुरगाव वारकरी संस्थेतर्फे दुसऱ्या वारीचे आयोजन केले. या वारीत जवळजवळ 120हून अधिक वारकऱ्यांनी आपला सहभाग दर्शविला आणि ही वारी यशस्वी केली. दरम्यान संस्थेतर्फे यंदा तिसऱ्या पंढरपूर पायी वारीचे आयोजन करण्यात आले असून या वारीच्या अर्ज वितरणाला सुरुवात काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हेडलॅण्ड सडा येथे बामणवाडी येथील श्री ब्रह्मेश्वर मंदिरात करण्यात आली. त्याप्रमाणे प्रतिमाऊली वारकरी 3000 हजार रुपये शुल्क आकारून एक छायाचित्र व आधारकार्ड झेरोक्स प्रत घेऊन नावनोंदणीला सुरुवात करण्यात आली.

11 जुलै रोजी प्रयाण
वारी 11 जुलै 2026 रोजी सकाळी 6.00 वाजता हेडलॅण्ड सडा बामणवाडी येथील श्री ब्रह्मेश्वर मंदिराकडून प्रस्थान करणार आहे. सुमारे 12 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करत विठ्ठल नामाच्या गजरात वारकरी गुरुवार, 23 जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार आहेत. यानंतर 25 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात कीर्तन, भजन आणि नामस्मरणाच्या गजरात धार्मिक सोहळा साजरा केला जाईल. त्यानंतर 26 जुलै रोजी पंढरीनाथाचे दर्शन घेऊन वारकरी पंढरपूरहून गोव्याकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील. या वारीत सहभागी होण्यासाठी परिसरातील वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप म्हावळणकर यांनी केले आहे. पायी वारीसाठी नियम व अटी ठरविण्यात आल्या असून त्या संपर्क केल्यानंतर पाठविण्यात येतील. मर्यादित प्रवेश देण्यात येतील. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दिलीप म्हावळणकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.