मुरगाव बंदरात बार्ज बुडाली; सातही कामगारांना वाचविले

0
83

मुरगाव बंदरात काल पहाटे मे. एन. के. सिंग शिपिंग कंपनीची ‘नील’ ही खनिजवाहू बार्ज एका ट्रॉलरच्या अवशेषाला धक्का बसल्याने समुद्रात बुडाली. मात्र, बार्जमध्ये असलेल्या सातही कामगारांना सहीसलामत वाचविण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी एक मच्छीमारी ट्रॉलर मुरगाव बंदरात बुडाला होता. त्याचे अवशेष अजून समुद्रात असून जवळपास भागातून बार्जेस, ट्रॉलर व इतर जहाजे ये-जा करीत असतात. त्यामुळे ट्रॉलर बुडालेल्या जागी धोक्याची निशाणी लावण्यात येते. मात्र, काल पहाटेच्या वेळी ९६० टन खनिज घेऊन मुरगाव बंदराकडे येणारी बार्ज अंदाज न आल्याने ट्रॉलरच्या अवशेषांमध्ये अडकून बुडाली. यावेळी बार्जमध्ये सात कामगार होते. त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याने धोका टळला. सध्या बार्जमधील खनिज माल खाली करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खनिज माल खाली केल्यानंतर बार्ज वर काढण्यात येणार आहे.