उत्तराखंड : विश्‍वासदर्शक ठरावाचा आज निकाल

0
92

>>विजयी झाल्याचा हरीश रावत यांचा दावा

उत्तराखंड विधानसभेत काल सकाळी विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान झाले. बहुमत चाचणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाला बंद पाकिटात सादर करण्यात आला असून आज होणार्‍या सुनावणी दरम्यान उत्तराखंडमध्ये कोण विजयी झाले याचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, शक्तीपरीक्षणानंतर कॉंग्रेस नेते हरीश रावत यांनी बहुमत मिळाल्याचा दावा केला आहे. कॉंग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांना विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले होते. बहुमत चाचणीसाठी येणार्‍या कॉंग्रेस आमदारांचे रावत विधानसभेच्या प्रवेशद्वारावरच स्वागत करत होते. दुसरीकडे भाजप नेेते भीमलाल आर्य उशिरानेच दाखल झाले. सर्वांचे लक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाचे दोन्ही आमदार कॉंग्रेसला पाठिंबा देतील, असे पक्षाध्यक्ष मायावती यांनी सकाळीच नवी दिल्लीत जाहीर केल्याने कॉंग्रेसचे बळ वाढले होते. मात्र, कॉंग्रेसच्या एक आमदार रेखा आर्य या बहुमत चाचणीवेळी येताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांच्यासोबत आल्याने त्या कॉंग्रेसला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. काल सकाळी साडेअकरा वाजता सभागृहात बहुमत चाचणीला सुरुवात झाली. विश्‍वासदर्शक ठरावावेळी दोन पर्यवेक्षक उपस्थित होते. सभागृहातील कामकाजाचे चित्रीकरण करण्यात आले. कामकाजाचा अहवाल बंद लिफाफ्यामधून सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आला आहे. न्यायालय आज विश्‍वासदर्शक ठराव कोण जिंकले याची अधिकृत माहिती देणार आहे. मात्र, सभागृहातून बाहेर पडलेल्या कॉंग्रेस व भाजप आमदारांच्या हावभावांवरून कोण जिंकले हे स्पष्ट होत होते. दरम्यान, शक्तीपरीक्षणानंतर माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते हरीश रावत म्हणाले, उद्याच्या दिवसाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहात आहोत. उत्तराखंडवर पसरलेले अनिश्‍चिततेचे काळे ढग दूर होतील. मात्र, सभागृहातील कामकाजावर टिप्पणी करण्यास त्यांनी नकार दिला. भाजप आमदार गणेश जोशी यांनी कॉंग्रेसने पैशांचा वापर केल्याचा आरोप केला. आम्ही तसे केले असते तर कदाचित आम्हांलादेखील बहुमत मिळाले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.