पणजी पोलिसांनी पणजी मुख्य टपाल कार्यालयामधील एका टपाल साहाय्यकाच्या विरोधात सुमारे 10.98 लाखांचा कथित गैरव्यवहार केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी प्रवीण लहाने (रा. बुलढाणा महाराष्ट्र) याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस जारी केली आहे.
या प्रकरणात उप पोस्टमास्तर मनीषा जागडे यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी प्रवीण लहाने हा सहाय्यक कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत होता आणि त्याच्यावर नागरिक व सरकारी कार्यालयांना सरकारी टपाल आणि सेवा तिकिटे जारी करण्याची आणि विकण्याची जबाबदारी होती. संशयित आरोपीने 25 जानेवारी 2025 ते 23 मार्च 2026 या कालावधीत पोस्ट खात्याच्या एपीटी आयटी 2.0 सॉफ्टवेअर आणि मॅन्युअल रजिस्टर या दोन्हीमध्ये तिकीट विक्रीबाबत योग्य नोंदी ठेवल्या नाहीत. त्यामुळे सुमारे टपाल खात्याचे 10.98 लाखांचे नुकसान झाल्याचा संशय आहे. त्याने वैयक्तिक वापरासाठी निधीचा गैरवापर केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात उपनिरीक्षक नितीन नाईक तपास करीत आहेत.