आरक्षण हे सक्षमीकरणासाठी असावे, राजकीय दिखाव्यासाठी नव्हे, असे ठाम मतप्रदर्शन गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाने केले आहे. भाजप सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या सीमांकन आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ओबीसी अध्यक्ष शरद चोपडेकर यांनी सांगितले की, महिला आरक्षण विधेयक 2023 हे स्वागतार्ह असले तरी त्याची अंमलबजावणी घाईगडबडीत व राजकीय हेतूने होत असल्याची शंका आहे. जातीनिहाय जनगणना टाळल्यामुळे ओबीसी, एसटी व इतर वंचित घटकांची अचूक लोकसंख्या समोर येत नाही. त्यामुळे आरक्षण व सीमांकन प्रक्रिया न्याय्य ठरणार नाही. लोकसभा जागावाढ व मतदारसंघ पुनर्रचनेमुळे आर्थिक भार वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. खरे सक्षमीकरण तळागाळातूनच व्हावे, असे नमूद करत काँग्रेसने नेहमीच समावेशक धोरणांचा पुरस्कार केला आहे. महिला व मागासवर्गीयांनी राजकीय दिखाव्याला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.