मुख्यमंत्र्यांच्या दोडामार्गमधील प्रचंड जमीन खरेदीची चौकशी व्हावी : सरदेसाईंची मागणी

0
171

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोडामार्ग येेथ तब्बल १ कोटी २० लाख चौ. मी. एवढी जमीन विकत घेतली असल्याचा आरोप काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केला. ३८ लाख रु.ना ही जमीन खरेदी करण्यात आली असल्याचे सांगतानाच दोडामार्गचा गोव्यात समावेश केला जावा अशी मागणी होऊ लागली आहे. त्यामागे हे रिएल इस्टेटचे राजकारण असल्याचे सरदेसाई म्हणाले.

एकदा दोडामार्ग गोव्याचा भाग बनले की प्रमोद सावंत यानी येथील खरेदी केलेल्या जमिनीचे दर प्रचंड वाढणार असल्याचे सरदेसाई म्हणाले. या जमीन खरेदी व्यवहाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.
जमीन दलालांनाच दोडामार्गचा गोव्यात समावेश झालेला हवा आहे, असे मत तेथील शिवसेना नेते बाबुराव धुरी यांनी व्यक्त केले असल्याचे सरदेसाई म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जेव्हा महाराष्ट्रात गेले होते तेव्हाच हा जमीन खरेदीचा व्यवहार झाला असल्याचे सरदेसाई म्हणाले.

केवळ २१ हजार चौ. मी.
जमिनीची खरेदी : मुख्यमंत्री

दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचा विरोधकांनी केलेल्या आरोपाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खंडन केले असून केवळ २१ हजार चौरस मीटर औद्योगिक व शेतीचा भूखंड खरेदी केला आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.

कांदोळी येथे कार्यक्रमाच्या दरम्यान पत्रकारांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जमीन खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपाबाबत प्रश्‍न विचारला त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योगधंदा सुरू करण्यासाठी हा भूखंड खरेदी केला आहे. सदर जमीन खरेदीत गैर काहीच करण्यात आलेले नाही. आपण जमिनीसाठी बँक खात्यातून पैसे दिलेले आहेत. दोडामार्ग तालुका गोव्यात समाविष्ट करण्याच्या मागणीशी आपला काहीच संबंध नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.