साखळी येथे डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आषाढी एकादशीनिमित्त साखळी येथे श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात मनोभावे पूजा केली. या वेळी सौ. सुलक्षणा सावंत याही उपस्थित होत्या. या वेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येवो अशी विठ्ठल-रखुमाई चरणी प्रार्थना केली. तसेच गोव्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. या वेळी त्यांनी देवस्थान समितीने भाविकांची उत्तम व्यवस्था व नेटके आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. या वेळी उपस्थित वारकरी भक्त मंडळी यांच्याशी त्यांनी संवाद साधला तसेच समस्त गोमंतकीयांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
पंढरपूरमध्ये गोव्यातून अनेक वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दाखल झाले असून त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेत पूजा केली.
राज्यातील विविध मंदिरांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध संस्था अनेक विद्यालयांमध्येही आषाढी एकादशीनिमित्त वारी, भजन, कीर्तन, दिंडी तसेच गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपुरात फडणवीसांनी केली सपत्नीक पूजा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसे. सौ. अमृता फणवीस यांनी काल 6 जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला. देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा हिची उपस्थिती होती. विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. तिथे मूर्तीला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले असून संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.
दरम्यान, महिनाभर वारी करत चालत असणारे वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीनगरीत दाखल झाले आहेत. यंदा नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरले आहेत. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
शेतकरी, जनतेच्या समृद्धीसाठी
प्रार्थना ः मुख्यमंत्री फडणवीस
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.