आमदार व्हिएगस व सिल्वा यांची माहिती
येऊ घातलेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आम आदमी पक्ष राज्यातील अनुसूचित जमातींच्या लोकांच्या प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडणार असल्याचे काल आपचे आमदार वेंन्झी व्हिएगस व क्रुझ सिल्वा यांनी सांगितले. काल मडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात आम आदमी पक्षाने अनुसूचित जमातीतील एक नेते विनय वेळीप यांना पक्षात प्रवेश दिला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात व्हिएगस व सिल्वा बोलत होते. आप सत्तेवर आल्यास गोव्यात आदिवासी भवन उभारण्यात येणार असल्याचे द्वयींनी स्पष्ट केले.
2027 ची विधानसभा निवडणूक व त्यानंतरही लोकसभा निवडणूक येईपर्यंत एसटींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल की नाही याविषयी प्रश्नचिन्ह असल्याचेही वरील नेत्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आम आदमी पक्ष प्रदेश अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी यावेळी बोलताना आदिवासींच्या जंगल हक्क कायद्याची योग्य प्रकारे अमलबजावणी होत नसल्याचा आरोप केला. त्यांचे अन्य कित्येक प्रश्नही प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. यावेळी आपचे नेते प्रशांत नाईक, सिद्धेश भगत, गेर्सन गोम्स, प्रदीप लोगन आदी हजर होते.