मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी वाढदिवस

0
98

>> १०९ जणांची समिती ः वेलिंगकरांचेही नाव

 

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा येत्या ४ जुलै रोजी ६० वा वाढदिवस असून तो दि. ५ जुलै रोजी संध्याकाळी ५ वा. ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली १०९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री ङ्ग्रान्सिस डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या समितीवरील सदस्यांमध्ये भाभासुमंचे नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांचाही समावेश आहे.
सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच निमंत्रित पाहुणे म्हणून भाजपचे उपाध्यक्ष तथा गोवा प्रभारी पुरुषोत्तम रुपाला उपस्थित राहतील, असे डिसोझा यांनी सांगितले.
सत्कार समितीचे उपाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री ङ्ग्रान्सिस डिसोझा, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर व साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर तर सचिव म्हणून उद्योगमंत्री महादेव नाईक जबाबदारी सांभाळतील. अन्य सर्वजण सदस्य आहेत. सत्कार समितीत प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचाही समावेश आहे.
त्यामुळे पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता वेलिंगकर यांचा त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संबंध
आहे.
तात्विक मतभेद असले तरी त्याचा वाढदिवसावर परिणाम होऊ शकत नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सोहळ्यास किती लोकांची उपस्थिती असेल, असे विचारले असता पावसामुळे तो खुल्या जागेत साजरा करणे शक्य नाही, असे ते म्हणाले. पार्सेकर यांना कार्यपद्धतीच्या बाबतीत आपण अनेक सूचना केल्या होत्या. आता प्रशासन चांगले चालत आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्‍न सोडविल्याचे डिसोझा यांनी सांगितले. आपण त्यांचे विरोधक नसल्याचे ते म्हणाले.