मुख्यमंत्र्यांकडील अतिरिक्त खात्यांचे वाटप दसर्‍यानंतर ः सरदेसाई

0
147

पणजी (न. प्र.)
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत एम्समध्ये आपले सहकारी मंत्री तसेच भाजपच्या गाभा समितीच्या सदस्यांबरोबर बैठक घेऊन विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी प्रथम सकाळी भाजपच्या गाभा समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा केली व नंतर दुपारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांबरोबर चर्चा केली, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर त्यांच्याकडील अतिरिक्त खाती मंत्र्यांना दसर्‍यानंतर देणार असल्याची माहिती मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. तर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पर्रीकर हेच मुख्यमंत्रीपदी राहतील अशी माहिती दिली.
यासंबंधी माहिती देताना नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई म्हणाले की, पर्रीकर यांनी काल एम्समध्ये मंत्र्यांबरोबर चर्चा केली. यावेळी त्यांनी आपणाकडे असलेली खाती दसर्‍यानंतर मंत्र्यांना वाटून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचे सरदेसाई म्हणाले.
दसर्‍यानंतर विकासकामांना येणार वेग
सरदेसाई म्हणाले की, आम्ही यावेळी पर्रीकर यांच्याशी प्रशासन, विकासकामे, राजकारण व अन्य महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा केली. पर्रीकर यांनी आपणाकडे असलेली खाती दसर्‍यानंतर मंत्र्यांना वाटून देण्याचा निर्णय घेतलेला असून दसर्‍यानंतर विकासकामे सुरू होतील. अडून पडलेल्या विकासकामांना दसर्‍यानंतर वेग येणार असल्याचे सरदेसाई म्हणाले.
सरकारच्या स्थैर्यासाठी पर्रीकरांचे प्रयत्न
सरकार स्थिर रहावे यासाठी पर्रीकर यांचे प्रयत्न असून त्यादृष्टीने त्यांनी योग्य ती पावले उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
विकासकामांवर चर्चा ः सुदिन
बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, मुख्यमंत्री जी खाती देतील ती आम्ही स्वीकारू. बैठकीत प्रामुख्याने विकासकामांवर चर्चा झाल्याचे ढवळीकर म्हणाले. आपल्या आजारपणामुळे मागील काही महिने अडून पडलेली विकासकामे येत्या तीन महिन्यांच्या काळात मार्गी लागलेली पर्रीकर यांना हवी आहेत.
एका वेळी एकामंत्र्याबरोबर बैठक
भाजपच्या गाभा समितीच्या सदस्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर पर्रीकर यांनी काल एका वेळी एका मंत्र्याबरोबर बैठक घेऊन त्यांच्याशी आपल्याकडे असलेली खाती, प्रशासन, विकासकामे याबाबत सविस्तर चर्चा करून माहिती मिळवली. विकासकामे व अतिरिक्त खात्यांचे वाटप याबाबत आपल्या मनात काय आहे याची माहिती त्यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्याशी बोलताना दिली. अतिरिक्त खात्यांचे वाटप आपण दसर्‍यानंतर करणार असल्याची कल्पना पर्रीकर यांनी यावेळी मंत्र्यांना दिली.
भाजपच्या गाभा समितीबरोबर बैठक
मंत्र्यांबरोबर बैठक घेण्यापूर्वी पर्रीकर यांनी भाजपच्या गाभा समितीच्या सदस्यांबरोबर बैठक घेतली. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, खासदार विनय तेंडुलकर, सुनील देसाई व दत्तप्रसाद खोलकर यांचा समावेश होता. पर्रीकर यांची काल एम्समध्ये भेट घेतलेल्या मंत्र्यांमध्ये विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर यांच्या बरोबरच रोहन खंवटे, गोविंद गावडे यांचाही समावेश होता.
मुख्यमंत्री गृह, अर्थ स्वतः जवळच ठेवणार
दसर्‍यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आपणाकडे असलेली अतिरिक्त खाती मंत्र्यांना वाटून देणार असले तरी त्यांच्याकडे असलेली गृह, अर्थ आदी महत्त्वाची खाती ते आपणाकडेच ठेवणार आहेत, असे सूत्रांनी काल सांगितले.
पर्रीकर हेच मुख्यमंत्रिपदी ः श्रीपाद
या बैठकीनंतर श्रीपाद नाईक म्हणाले की बैठकीत पर्रीकर यांनी राज्य प्रशासनाचा आढावा घेतला. बैठकीत नेतृत्व बदलाच्या प्रश्‍नावर चर्चा झाली नाही. पर्रीकर यांची प्रकृती सुधारत असून तेच मुख्यमंत्रीपदी राहतील. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दिवाळीच्या दरम्यान राज्यात परतणार असल्याची माहितीही नाईक यांनी दिली.