मुख्यमंत्री पर्रीकरांनी गृहखाते अन्य मंत्र्याकडे द्यावे : कॉंग्रेस

0
143

राज्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडलेली असून ती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्याकडील गृह खाते अन्य मंत्र्याकडे द्यावे अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केली.
मच्छिमारी खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी आपणाला ड्रग माफियांपासून धोका असल्याचे नमूद केले आहे. राज्यातील मंत्र्यानाही धमक्या येऊ लागल्या तर सामान्य माणसांचे काय होईल अशी भीती व्यक्त करून कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी पर्रीकर यांनी गृह खाते दुसर्‍या मंत्र्याकडे द्यावे, असे नाईक म्हणाले. मुख्यमंत्री पर्रीकर हे कामात व्यस्त असल्याने गृह खात्याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नसावा. परिणामी कायदा व सुव्यवस्था बिघडली असावी, असे नाईक म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किमती घसरलेल्या असताना देशात पेट्रोलचे दर वाढत कसे आहेत, असा सवालही त्यांनी केला. देशाच्या राष्ट्रपतीपदी, उपराष्ट्रपतीपदी व पंतप्रधानपदी संघाच्या विचारसरणीच्या व्यक्ती विराजमान झाल्याने देशाच्या धर्मनिरपेक्षतेला कधी नव्हे एवढा धोका निर्माण झाला आहे, असा दावा नाईक यांनी केला. यामुळे भयावह स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी खोटे बोलणे व खोटा प्रचार करणे सोडून द्यावे असेही नाईक यावेळी म्हणाले. राहूल गांधी यांचा त्यांनी ‘पप्पू’ व ‘शहजादा’ असा उल्लेख करणे थांबवावे, अशी मागणीही नाईक यांनी यावेळी केली. सोशल मिडियातून राहूल गांधी यांच्यावर जहाल टीका करण्यासाठी मोदी यांनी २० आयटी व्यावसायिकांची नेमणूक केली असल्याचे नाईक म्हणाले.
विदेश दौर्‍यांचा काहीही फायदा नाही
नरेंद्र मोदी हे सतत विदेश दौर्‍यांवर असतात. पण ह्या विदेश दौर्‍यांचा काहीही फायदा झालेला असून उलट पाकिस्तान पाठोपाठ आता चीनही भारताबरोबर युध्दास तयार झाला असल्याचे भारताच्या लष्कर प्रमुखाने स्पष्ट केले असल्याचे नाईक म्हणाले.