वाढीव सुरक्षेची मागणी केलेली नाही : पालयेकर

0
129

ड्रग माफियांकडून आपणाला धमक्या येत असल्या तरी आपण वाढीव सुरक्षा व्यवस्थेची मागणी केलेली नाही, असे मच्छिमारी व जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पोलीसांनी आपणाला सुरक्षा व्यवस्था पुरवलेली आहे व आणखी वाढीव सुरक्षेची आपणाला गरज आहे असे आपणाला वाटत नसल्याचे पालयेंकर यांनी सांगितले.
दरम्यान राज्यातील ड्रग माफियांसंबंधी उघडपणे भूमिका घेणारे मच्छिमारी मंत्री विनोद पालयेंकर याना या माफियांकडून धमक्या येऊ लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना चोख सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली असली तरी ह्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचे काम चालू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले. मंत्री विनोद पालयेकर यांना जर वाढीव सुरक्षा व्यवस्थेची गरज आहे असे दिसून आले तर ती पुरवण्यात येणार असल्याचे ह्या अधिकार्‍याने स्पष्ट केले. एकूणच राज्यातील सर्व अतिमहनीय व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. ज्या अतिमहनीय व्यक्तींना वाढीव सुरक्षा व्यवस्थेची गरज आहे असे दिसून येईल त्यांना ती पुरवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले. मंत्री विनोद पालयेकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा प्राधान्य क्रमाने घेतला जात असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.