मुख्यमंत्री पर्रीकरांकडून कॉंग्रेस आमदारांची छळणूक : चोडणकर

0
58

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेस आमदारांना छळण्यासाठी शुक्लकाष्ठ लावण्याचे सत्र अवलंबिले असून दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय कॉंग्रेस सचिव गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
पर्रीकर यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरू केला असून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पर्रीकर यांनी पणजीतून पोटनिवडणूक लढवावी, असे आव्हान चोडणकर यांनी त्यांना दिले आहे.
कामत यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणी सत्य उघडकीस आणणार्‍या काही वर्तमानपत्रांना पर्रीकर यांनी नोटिसा पाठविल्याचे चोडणकर यांनी सांगितले. या कामासाठी सरकारी अधिकार्‍यांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर असुरक्षित बनले आहेत. त्यामुळेच ते सचिवालयातील पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध घालू पहात आहेत. या अलोकशाही प्रस्तावाचा गिरीश चोडणकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला व लोकशाहीच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी पर्रीकर यांनी या प्रस्तावाचा फेरविचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.