मुंबई हल्ला हे तीन देशांच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश

0
112

मुंबईवर झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला हा अमेरिका, ब्रिटन आणि भारत या तीन देशांच्या गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीचा सांधा वेळीच जुळवता न आल्यानेच होऊ शकल्याचा निष्कर्ष एका अहवालात काढण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्स, प्रोपब्लिका आणि पीबीएस यांच्या या अहवालात मुंबई हल्ल्यासंदर्भातील त्रुटींचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या तिन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांना त्यांच्या तंत्रज्ञान आधारित गुप्तहेरीतून बरीच माहिती मिळालेली होती. मात्र, त्या माहितीचा त्यांना योग्य तो उपयोग करता आला असता तर दहशतवादी हल्ला टळू शकला असता, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.
एडवर्ड स्नोडेनने उघडकीस आणलेल्या काही गुप्त कागदपत्रांचा हवाला देऊन या अहवालात नमूद करण्यात आले आहे की इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने केलेल्या गुप्तहेरीतून काही दुवे गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागले होते. अशा माहितीची सांगड अन्य मार्गांनी मिळालेल्या माहितीशी वेळीच घातली गेली असती, तर संभाव्य कटाचे धागेदोरे हाती लागू शकले असते असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुंंबई हल्ल्याचा एक सूत्रधार झर्रार शाह याच्या ऑनलाइन कारवायांवर भारत आणि ब्रिटन यांच्या गुप्तचर यंत्रणांची नजर होती. मात्र, या हल्ल्याचा कट शिजतो आहे याचा अंदाज या यंत्रणांना बांधता येऊ शकला नाही असेही या अहवालात म्हटले आहे. शाह याच्या हालचालींवर केवळ ब्रिटनच्या गुप्तचरांची नजर होती असे नव्हे, तर भारतीय गुप्तचर यंत्रणांचेही त्याच्यावर बारीक लक्ष होते असेही आढळून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेला भारत व ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांच्या हेरगिरीचा पत्ता नव्हता, पण त्यांना अन्य माध्यमातून कटाचा सुगावा लागलेला होता आणि या हल्ल्याच्या कित्येक महिने आधी त्यांनी भारत सरकारला सावध केले होते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकी कंपनीकडून व्हॉईस ओव्हर इंटरनेट फोन सेवा विकत घेण्यासाठी आपण एक भारतीय उद्योजक असल्याचे भासवून बोलणी केली होती. हीच व्हॉईप सेवा मग दहशतवाद्यांनी २६/११ च्या हल्लेखोरांशी संभाषण करण्यासाठी वापरली असे आढळून आले आहे. झर्राश शाह याने आपल्या निश्‍चित ठिकाणाचा पत्ता कोणाला लागू नये यासाठी आपले कॉल न्यूजर्सीहून वळवले होते असेही तपासात आढळले आहे.
मुंबई हल्ल्यानंतर हा हल्ला हैदराबाद डेक्कन मुजाहिद्दीन या नावाच्या अस्तित्वात नसलेल्या संघटनेने घडवल्याचा बनाव हल्लेखोरांनी रचल्याचे उघड झाले आहे. झर्रार शाहच्या ऑनलाइन हालचालींचा अन्वयार्थ गुप्तचर यंत्रणांनी वेळीच लावला असता तर कटाचा पर्दाफाश करता आला असता असे अहवालात म्हटले आहे.