मुंबईविरुद्धच्या लढतीत पंजाब ‘किंग’

0
127

मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या लढतीत पंजाबचा संघ ‘किंग’ ठरला. त्यांनी मुंबई इंडियन्सवर ९ गडी व १४ चेंडू बाकी राखत मात करीत सलग तीन पराभवांनंतर आपला विजय साकारला. कर्णधार लोकेश राहुलची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.

पराभवांची हॅट्‌ट्रिक झाल्यामुळे पंजाब किंग्जसाठी विजय महत्त्वाचा होता आणि शानदार खेळ करीत त्यांनी तो मिळवला. मुंबई इंडियन्सकडून मिळालेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने १७.४ षटकांत गाठले. कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल यांनी पंजाबला चांगली सुरुवात करून देताना ७.२ षटकांत ५३ धावांची भागीदारी केली. मयंक २५ धावा जोडून चहरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर राहुलने फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेत शानदार अर्धशतकी खेळी करीत ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलच्या साथीत संघाचा महत्त्वपूर्ण विजय साकारला. राहुलने ३ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने ५२ चेंडूंत नाबाद ६० धावांचे योगदान दिले. तर गेलनेही काही शानदार फटके मारताना नाबाद ४५ धावा जोडल्या. विजयामुळे पंजाब गुणतक्त्यात ४ गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचली आहे.

तत्पूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व मुंबई इंडियन्सला ६ बाद १३१ धावांवर रोखण्यात यश मिळविले. मुंबई इंडियन्सची सुरुवात एकदम खराब झाली. त्यांचा दक्षिण आफ्रिकन यष्टिरक्षक फलंदाज क्वींटन डी कॉक केवळ ३ धावा जोडून दुसर्‍याच षटकात दीपक हूडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ईशान किशन याही सामन्यात अपयशी ठरला व ७व्या षटकात १७ चेंडूत ६ धावा करुन रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या सुर्यकुमार यादवच्या साथीत कर्णधार रोहितने मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी ७९ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. जमलेली ही जोडी रवी बिश्नोईने फोडली. त्याने १७ व्या षटकात सुर्यकुमारला (३३) ख्रिस गेलकरवी झेलबाद केले. लगेच अर्धशतकी खेळी केलेला रोहित शर्मा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फॅबिएन ऍलेकडे झेल देऊन माघारी परतला. रोहितने ५ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ५२ चेंडूंत ६३ धावांचे अर्धशतकी योगदान दिले.

हार्दिक पंड्याही अपयशी ठरला. मोठा फटका मारण्याच्या नादात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर १ धाव करून बाद झाला. पाठोपाठ कृणालही ३ धावा करून परतला. अखेर कीरॉन पोलार्डने नाबाद १६ धावा करीत संघाला १३१ धावांपर्यंत पोहोचवले.
पंजाबकडून मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी २ तर दीपक हूडा आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ बळी मिळविला.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः क्वींटन डी कॉक झे. मॉईसेस हेनरिक्स गो. दीपक हूडा ३, रोहित शर्मा झे. फॅबियन ऍलन गो. मोहम्मद शमी ६३, ईशान किशन झे. लोकेश राहुल गो. रवी बिश्नोई ६, सूर्यकुमार यादव झे. ख्रिस गेल गो. रवी बिश्नोई ३३, कीरॉन पोलार्ड नाबाद १६, हार्दिक पंड्या झे. दीपक हूडा गो. अर्शदीप सिंग १, कृणाल पंड्या झे. निकोलास पूरन गो. मोहम्मद शमी ३, जयंत यादव नाबाद ०.

अवांतर ः ६. एकूण २० षटकांत ६ बाद १३१ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-७ (क्वींटन डी कॉक, १.६), २-२६ (ईशान किशन, ६.६), ३-१०५ (सूर्यकुमार यादव, १६.१), ४-११२ (रोहित शर्मा, १७.३), ५-१२२ (हार्दिक पंड्या, १८.४), ६-१३० (कृणाल पंड्या, १९.५)
गोलंदाजी ः मॉईसेस हेनरिक्स ३/०/१२/०, दीपक हूडा ३/०/१५/१, मोहम्मद शमी ४/०/२१/२, रवी बिश्नोई ४/०/२१/२, फॅबियन ऍलन ३/०/३०/०, अर्शदीप सिंग ३/०/२८/१.

पंजाब किंग्ज ः लोकेश राहुल नाबाद ६०, मयंक अगरवाल झे. सूर्यकुमार यादव गो. राहुल चहर २५, ख्रिस गेल नाबाद ४३.
अवांतर ः ४. एकूण १७.४ षटकांत १ बाद १३२ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-५३ (मयंक अगरवाल, ७.२)
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट २.४/०/३०/०, कृणाल पंड्या ३/०/३१/०, जसप्रीत बुमराह ३/०/२१/०, राहुल चहर ४/०/१९/१, जयंत यादव ४/०/२०/०, कीरोन पोलार्ड १/०/११/०.