कोलकाता-राजस्थानला प्रतीक्षा विजयाची

0
137

आयपीएलच्या चौदाव्या पर्वात तळाला असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात आज १८वा सामना रंगणार आहे. आपले पहिले सामने जिंकल्यानंतर दोन्ही संघांनी पराभवांची हॅट्‌ट्रिक साधलेली आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या प्रतीक्षेत असतील. त्यात कोण बाजी मारतोय ते आज कळेल.

राजस्थान संघाने गेल्या सामन्यात १७७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. परंतु त्यांच्या गोलंदाजांनी पार निराशा केली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्यांची गोलंदाजी फोडून काढताना हे लक्ष्य एकही गडी न गमावता २१ चेंडू बाकी राखत गाठले होते. देवदत्त पडिक्कलने नाबाद शतक, तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतकी योगदान दिले होते. बेन स्टोक्सची उणीव राजस्थानला जाणवतेय. जोस बटलरने काहीसी प्रभावी खेळी केलीय. परंतु तो दोन वेळा पावरप्लेमध्येच आपली विकेट गमावून बसलेला आहे. त्याचा सलामीचा जोडीदार मनन वोहराही दिल्लीविरुद्धचा एक सामना सोडल्यास अपयशी ठरलेला आहे. राजस्थानच्या फलंदाजांनी पावरप्लेमध्ये अन्य सर्व संघापेक्षा जास्त विकेट्‌स गमावलेल्या आहेत. मननच्या जागी यशस्वी जैसवाल किंवा अनुज रावत यांना संधी मिळू शकते. आता यापुढे राजस्थानकडे स्टोक्स, लिव्हिंगस्टोन बरोबरच जोफ्रा आर्चरही नसणार आहे. त्यामुळे कर्णधार संजू सॅमसम, शिवम दुबे आणि ऑस्ट्रेलियन डेव्हिड मिलर यांना चांगले योगदान द्यावे लागणार आहे. राहुल तेवातिया आणि जयदेव उनाडकटही उपयुक्त अष्टपैलू कामगिरी करीत आहेत.

दुसर्‍या बाजूने आपल्या शुभारंभी सामन्यातील विजयानंतर राजस्थानप्रमाणेच पराभवांची हॅट्‌ट्रिक केलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससाठीही हा सामना महत्त्वाचा आहे. आजच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यास ते तळाल फेकले जाऊ शकतात. त्यांच्यासाठी कमजोर बाजू ठरलीय ती त्यांच्या सलामीवीरांची अपयशी कामगिरी. नितिश राणाने काहीसी चकम दाखवली आहे. परंतु शुभमन गिलला अजून लय मिळालेली नाही आहे. चेन्नईविरुद्धच्या गेल्या सामन्यात आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्सच्या विस्फोटक खेळीमुळे गेल्या जवळ जवळ विजयाकडे वाटचाल केली होती.

परंतु तळाच्या फलंदाजांनी योग्य साथ न दिल्याने त्यांना विजयासाठी १८ धावा कमी पडल्या होत्या. कमिन्स आणि रसेल हे त्यांचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. ते जर चालले तर कोलकाता कोणत्याही प्रतिस्पर्धी संघांवर भारी पडू शकतो. दिनेश कार्तिककडेही मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. गोलंदाजीत रसेल, कमिन्सबरोबरच प्रसिद्ध कृष्णा व वरुण चक्रवर्तीकडे बळी मिळवण्याची क्षमता आहे.

कोलकाता नाईट रायडर्स (संभाव्य) : नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सुनील नारायण, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नगरकोटी/शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा.

राजस्थान रॉयल्स (संभाव्य) : जोस बटलर (यष्टिरक्षक), यशस्वी जैसवाल/अनुज रावत, संजू सॅमसन (यष्टिरक्षक-कर्णधार), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन साकारिया, मुस्तफिजुर रहमान/अँड्र्यू टाय.