गोव्यात प्रादेशिक पक्षाची नितांत गरज असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय पक्ष स्थानिक पातळीवरील विषयांवर निर्णय घेऊ शकत नाहीत. प्रत्येक बाबतीत श्रेष्ठींवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे गोमंतकीय जनतेला खंबीर असा प्रादेशिक पक्ष हवा आहे, असे मोंतेरो यांनी सांगितले. कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना पर्याय निवडण्यासाठी मगो, युगोडेपा, सेव्ह गोवा यांच्याशी बोलणी चालू असून सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आल्यास राष्ट्रीय पक्षांना घरी पाठविणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षासाठी ‘दोन मेणबत्त्या’ हे निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. आपला पक्ष लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, कोणाचेही अपहरण करण्याची गरज नसल्याचे मोंतेरो यांनी सांगितले. कोणत्याही गैरव्यवहारात गुंतलेल्यांना पक्षाची दारे बंद राहतील असे ते म्हणाले.
बाणावलीचे आमदार मिकी पाशेको आज किंवा उद्या आमदारकीचा राजीनामा देणार असून त्यानंतरच ते गोवा विकास पार्टीत प्रवेश करू शकतील, असे मोंतेरो यांनी पुढे सांगितले. कुठ्ठाळी मतदारसंघातून नेली रॉड्रिगिस, तर कुडतरीतून डॉमनिक गावकर निवडणूक लढवण्यास तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, पर्यटन व्यवसायात सुधारणा करणे हे आपल्या पक्षाचे काम असेल. खाण व्यवसायातील गैरप्रकारांवर नियंत्रण, जनतेचे कल्याण करणे हा पक्षाचा कृतिकार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. पक्षाचे सध्या तीनशे सदस्य आहेत. पुढील पंधरा दिवसांत उमेदवार जाहीर करू अशी घोषणा त्यांनी केली.
गोवा विकास पक्षाची कार्यकारी समिती
व्हियोला पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली गोवा विकास पार्टीची समिती खालीलप्रमाणे आहे.
उपाध्यक्ष – रामनाथ एस. पी. बांदोडकर, सरचिटणीस – लिंडन मोंतेरो, खजिनदार – विकास प्रभुदेसाई, कार्यकारी सदस्य – सुंदर बांदोडकर, रवींद्र जुझे काब्राल, सर्वेश बांदोडकर, आंतोनियो क्रिसयिनो सिकेरा व गुरुनाथ बांदोडकर, तर पक्षाचे निर्वाचन अधिकार म्हणून संदीप बांदोडकर यांची नियुक्ती केली आहे. लोकशाही पद्धतीनेच वरील समिती निवडली असून त्यामुळे कुणालाही हरकत घेण्यास वाव नसल्याचे मोंतेरो यांनी सांगितले.
सीताराम बांदोडकरांच्या कुटुंबीयांचे नव्या कार्यकारिणीस आव्हान!
गोवा विकास पार्टीच्या व्हियोला पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीस हरकत घेणारे निवेदन पार्टीचे संस्थापक सीताराम बांदोडकर यांच्या कन्या स्नेहलता सिताराम बांदोडकर, शोभा सिताराम बांदोडकर, संगिता बांदोडकर व रोशन रामदास सावंत यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे.
आपला पक्ष बरखास्तही केलेला नाही व नव्या सदस्यांचीही नियुक्ती केलेली नाही त्यामुळे नव्या समितीस हरकत घेत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. वरील प्रकरणी चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.