मासळी व्यापार्‍यांची नोंदणी लवकरच सुरू

0
11

>> मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती; खात्याकडे नोंदणीचा प्रस्ताव स्वीकारला; आवश्यक शुल्क भरण्यासही तयार

मासळी व्यवसायातील व्यापार्‍यांची मत्स्योद्योग खात्याकडे नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती या खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. काल मत्स्योद्योग खात्याने मासळी व्यवसायातील व्यापार्‍यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत या व्यापार्‍यांनी मत्स्योद्योग खात्याकडे नोंदणी करण्याचा प्रस्ताव स्वीकारला, तसेच आवश्यक ते शुल्क भरण्याची तयारी दाखवल्याचे हळर्णकर यांनी सांगितले.

जेटींवरील मनमानी कारभाराच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात मत्स्योद्योग खात्याने कुटबण, खारीवाडा व मालिम जेटींच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले होते. तसेच मत्स्योद्योग खात्याच्या जेटींवर व्यवसाय करण्यासाठी २ लाख रुपये भरा आणि स्वत:ची व्यापारी म्हणून नोंदणी करा; अन्यथा व्यवसाय कायमचा बंद करा, असा इशारा दिला होता. मात्र नंतर लगेचच खात्याने सदर निर्णय १० दिवसांसाठी स्थगित ठेवत जेटींचे प्रवेशद्वार खुले केले होते. या पार्श्‍वभूमीवर काल मासळी व्यापारी आणि मत्स्योद्योग खात्याच्या अधिकार्‍यांसोबत नीळकंठ हळर्णकर यांनी बैठक घेतली.
राज्यातील मासळी व्यवसायातील व्यापारी राज्यातील विविध मच्छिमारी जेटींवरील साधनसुविंधांचा वापर करीत असतात; मात्र ते सरकारला कोणतेही व्यापार शुल्क देत नसल्याचे आढळून आल्याने मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी या व्यवसायातील व्यापार्‍यांना स्वत:ची मत्स्योद्योग खात्याकडे नोंदणी करून त्यासाठीचे शुल्क भरण्याचा प्रस्ताव दिला होता. काही दिवसांपूर्वी मासळी व्यापार्‍यांनी साळगावकर नामक बोटमालकावर बहिष्कार घातल्याने त्याची सुमारे दीड टन मासळी मालीम जेटीवर कुजून जाण्याची घटना घडल्यानंतर या व्यापार्‍यांच्या अरेरावीचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता.

मालीम मच्छिमारी जेटीवरील चेअरमन तर खूपच अरेरावी करीत असल्याच्या तक्रारी आपणाकडे आल्या होत्या, असे हळर्णकर यांनी सांगितले. मालीम जेटीवर बर्‍याच बेकायदा गोष्टी घडत असल्याचेही आढळून आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सुमारे महिनाभरापूर्वी या व्यवसायातील व्यापार्‍यांना मत्स्योद्योग खात्याकडे नोंदणी करण्याची सूचना केली होती. मात्र, त्यांनी सहकार्य केले नव्हते. त्या पार्श्‍वभूमीवर आपण मंगळवारी या व्यापार्‍यांबरोबर एक बैठक घेऊन त्यांना खात्याकडे मासळी व्यापारी म्हणून नोंद करण्याचा दिलेला प्रस्ताव त्यांनी स्वीकारल्याचे हळर्णकर यांनी स्पष्ट केले. आता या व्यापार्‍यांची खात्याकडे नोंदणी करण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरु होणार असल्याचे हळर्णकर यांनी स्पष्ट केले.

नोंदणीअभावी बुडत होता लाखोंचा महसूल

राज्यात मालिम, कुटबण व खारीवाडा-वास्को येथे मच्छिमारी जेटी आहेत. नियमानुसार मासळी व्यापार्‍यांना नोंदणी सक्तीची आहे. नोंदणीअभावी आतापर्यंत राज्य सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. आता सरकारने नोंदणीसाठी पुढाकार घेतल्याने सरकारच्या महसुलात भर पडणार आहे.

एलईडी फिशिंग, बुल ट्रॉलिंगवर नजर ठेवणार

खोल समुद्रात कुणालाही कसलीही कुणकूण लागू न देता बंदी असलेल्या एलईडी दिव्यांचा वापर करुन मासेमारी करणारे ट्रॉलर्स आणि बुल ट्रॉलिंग करणार्‍या बोटींवर नजर ठेवण्याचे काम मत्स्योद्योग खात्याने सुरू केले आहे, अशी माहिती देखील मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

सागरी अंमलबजावणी कक्ष स्थापणार

मत्स्योद्योग खात्याचा वेगळा सागरी अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ नेमले जाणार आहे. तसेच बोटींची खरेदी करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्व केले जात आहे. या कक्षासाठी पोलीस फौजेची गरज भासणार असून, त्यासंबंधी पोलीस खात्याशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे, असेही नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.