माली उपउपांत्यपूर्व फेरीत

0
88

येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात आफ्रिकन संघ मालीने न्यूझीलंडचा ३-१ अशा गोलफरकाने पराभव करीत ‘ब’ गटात दुसर्‍या स्थानी राहत फिफा अंडर-१७ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सोळा संघात स्थान मिळविले.

मालीने तीन सामन्यांतून २ विजयांसह ६ गुण मिळवित ‘ब’ गटात दुसरे स्थान मिळविले. तर न्यूझीलंड एका बरोबरीसह १ गुण मिळवित तिसर्‍या स्थानी राहिला.
मालीने सामन्यात आक्रमक खेळ करीत न्यूझीलंडवर पूर्ण सामन्यात बव्हंशी वर्चस्व राखले होते. दोनदा गोलपोस्टच्या आडव्या बारमुळे गोलसंधी गमावलेल्या मालीने १८व्याच मिनिटाला सालम जिदोउने नोंदविलेल्या गोलामुळे आघाडी मिळविली. जेमोउसा ट्रॅओरेकडून मिळालेल्या पासवर सालमने जोरकस फटक्याद्वारे संघाचे खाते खोलणारा हा गोल नोंदविला. पहिल्या सत्रात मालीने आपली आघाडी राखली.

दुसर्‍या सत्रात ५०व्या मिनिटाला जेमोउसा ट्रॅओरे मालीला २-० अशा आघाडीवर नेले. माली हा सामना सहज जिंकणार असे वाटत असताना ७२व्या मिनिटाला चार्ल्स स्प्रॅगने न्यूझीलंडची पिछाडी २ -१ अशी भरू काढत सामन्यात रंगत भरली. परंतु ८२व्या मिनिटाला लासाना डिआयेने मालीच्या ३ -० अशा विजयावर शिक्कामोर्तब करीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्‍चित केला.