बलाढ्य घानापुढे भारत निष्प्रभ

0
188

पहिल्या दोन सामन्यात आकर्षक आणि दर्जेदार खेळ करीत फुटबॉल प्रेमींकडून कौतुकाची थाप घेतलेल्या भारतीय संघाचा शेवटच्या गट सामन्यात बलाढ्य घानाच्या आक्रमक आणि गतीवान खेळापुढे निभाव लागू शकला नाही. काल खेळविण्यात आलेल्या सामन्यात त्यांना घानाकडून ४-० अशी हार पत्करावी लागल्याने सलग तिसर्‍या पराभवाने फिफा अंडर -१७ विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या अभियानाचा समारोप झाला.

दोन सामन्यांतील खेळ पाहत काल शेवटच्या सामन्यात भारतीय संघ आपला खेळ आणखी उंचावणार आणि दोन वेळच्या विजेत्या आफ्रिकन संघ घानाला कडवी झुंज देणार अशी अपेक्षा होती. परंतु पहिल्या सत्रानंतर भारतीय खेळाडू घानाच्या आक्रमक, चपळ आणि गतिमान खेळापुढे हतप्रभ झालेले दिसून आले. पहिल्या सत्रात गोलरक्षक धीरजमुळे घानाला १ -० अशा आघाडीवर समाधान मानावे लागले. चौथ्याच मिनिटाला त्यांने घानाचे प्रयत्न विफल केले. २०व्या मिनिटाला घानाची खाते खोलण्याची सुवर्णसंधी धीरजच्या चपळ गोलरक्षणामुळे वाया गेली. अखेर पहिल्या सत्राच्या अंतिम क्षणात ४३व्या मिनिटाला कर्णधास एरिक यियाहने गोल नोंदवित घानाचे खाते खोलले.

दुसर्‍या सत्रात घानाने खेळावर पूर्ण वर्चस्व राखले होते. त्यांच्या चपळ खेळापुळे भारतीय खेळाडूंचे काहीही चालले नाही. दबावाखाली गेलेल्या भारतीय खेळाडूंत सुसूत्रताच दिसून आली नाही आणि बचावफळीतील बर्‍यांच चुकांचा फायदा उठवित घानाने या सत्रात आणखी तीन गोल लादले. ५२व्या मिनिटाला कर्णधार एरिकने पुन्हा एकदा भारतीय बचावफळी भेदत संघाला २-० अशा आघाडीवर नेले. ८६व्या मिनिटाला रिकार्डो डान्सोने गोल नोंदवित घानाची आघाडी ३-० अशी केली. तर ८७व्या मिनिटाला राखीव खेळाडू एमानुएल टोकूने चौथा गोल नांेंदवित घानाचा बाद फेरीतील प्रवेश निश्‍चित केला.