मालमत्ता व्यवहारप्रकरणातून वास्कोत युवकाची हत्या

0
82

मालमत्ता व्यवहारप्रकरणातून बोगमाळो येथील रंघवी इस्टेटमध्ये नवेवाडे वास्को येथील अमर नाईक (३५) याची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही गोळी विदेशी बनावटीच्या पिस्तूलमधून झाडण्यात आली. गोळी झाडल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी दक्षिण गोवा अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी भेट दिली.

काल गुरूवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. अमर नाईक हा नवेवाडे येथे राहणारा असून त्याला दुपारी बोगमाळो येथील रंघवी इस्टेट येथे एका बंगल्याच्या व्यवहारप्रकरणी फोन करून बोलावण्यात आले. त्यानुसार अमर आपला मित्र प्रीतेश कुट्टीकर याच्यासमवेत इनोव्हाने रंघवी इस्टेटमध्ये गेला. तिथे या व्यवहारासंबंधी आलेल्या दोन व्यक्तींसोबत बोलणे झाल्यानंतर अमर व प्रीतेश हे घरी येण्यासाठी निघाले. त्यावेळी त्या दोन व्यक्तींनी अमर व प्रीतेश यांना आपण तुमच्या गाडीत बसून मद्यपान करू असे सांगितले. त्यानुसार अमर व प्रीतेश हे इनोव्हामध्ये बसले. त्यावर त्वरित त्या दोघांतील एकाने खिशातून पिस्तूल काढून अमर याच्या डोक्यात गोळी झाडली. अमर तिथेच गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याने प्रीतेश याच्यावरही पिस्तूल रोखले होते. मात्र प्रीतेशने प्रसंगावधान राखत त्यांना ढकलले. त्यावेळी त्या दोघांनीही तिथेच पार्क करून ठेवलेल्या त्यांच्या गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची गाडी समोर झाडीत कोसळली. ती तशीच टाकून तेथून ते पळून गेले.

त्यानंतर प्रीतेश याने अमर याच्या भावाला व आपल्या मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावले. अमर याला रुग्णवाहिकेतून चिखली इस्पितळात नेले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी गाडीचा तपास केला असता ती गाडी रेंट-अ-कार असून प्रतीश गोवेकर याच्या मालकीची असल्याचे आढळून आले.