मान्सून केरळात ४८ तासात शक्य

0
122

देशाच्या बहुतेक राज्यांमध्ये प्रचंड वाढलेले तापमान तसेच उष्म्याने लोक हैराण झालेले असतानाच येत्या ४८ तासात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. शेतकर्‍यांप्रमाणेच प्रत्येकजण सध्या पावसाच्या आगमनाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे. गोव्यातील शाळा आजपासून सुरू होत असल्या तरी येत्या दोन दिवसात पाऊस सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना उशिरापर्यंत वर्गांमध्ये बसणे उकाड्यामुळे कठीण ठरणार असल्याची पालकांमध्ये चर्चा आहे.

यंदाच्या मान्सूनला अपेक्षेएवढा जोर नसेल असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामानविषयक अंदाज वर्तवणार्‍या स्कायमेट या संस्थेचे वैज्ञानिक समर चौधरी यांनी काल सांगितले की येत्या ४८ तासांत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.

अल निनोचा प्रभाव
चौधरी म्हणाले, की मान्सूनपूर्व पाऊस सर्वसामान्यपणे १३१.५ मि. मि. एवढा होत असतो. मात्र यंदा आतापर्यंत त्याची ९९ मि. मि. एवढीच नोंद झाली आहे. अल निनोचा प्रभाव असल्याने यंदा मान्सूनवर परिणाम झाला आहे.

मान्सून लांबल्यास
पाणी समस्या शक्य
दरम्यान, गोव्याच्या विविध भागांमध्ये गेल्या बर्‍याच दिवसांपासून पाणी टंचाई व पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी आहेत. अनेक भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी टँकर पोचत नसल्याच्याही तक्रारी आहेत. धरणांच्या जलाशयांच्या पाण्याची पातळी खालावली असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर अंदाजानुसार मान्सून आगमन न होता तो लांबणीवर पडल्यास राज्यात पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.