मानसिक स्वास्थ्य सर्वांसाठी….

0
340
  • डॉ. प्रियंका सहस्रभोजनी
    (मानसरोग तज्ज्ञ, पर्वरी)

या वर्षी १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन २०२०असून आजचा विषय- ‘मानसिक स्वास्थ्य सर्वांसाठी ः मोठी गुंतवणूक- मोठी सुरुवात’ असा आहे. कारण आरोग्याची व्याख्या करताना त्यात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचाही समावेश करण्यात आला आहे.

कोविड-१९ च्या या महामारीच्या काळात आज सार्‍या जगाने ओळखलं आहे की मानसिक आरोग्य हा माणसाचा अधिकार आहे आणि ते त्याला मिळालेच पाहिजे. उत्तम, निरामय प्राथमिक आरोग्याची काळजी घेणं हीच जागतिक आरोग्याची कल्पना आहे आणि आजच्या कोविड-१९मुळे आलेल्या आणीबाणीच्या काळात ही निरामयता मिळवणं ही सगळ्यांची तातडीची गरज बनलेली आहे. अशा स्थितीत, मानसिक आरोग्याची काळजी घेण्यापासून कुणालाही वंचित ठेवायला नको. मानसिक आरोग्य समर्थक आणि आपल्या देशातील मानसिक आरोग्याच्या योजना बनवणार्‍यांनी कोविड-१९चा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम आणि नागरिकांवर पडणारा प्रभाव ही बाब विचारात घ्यायला हवी.

या कोविडच्या महामारीमुळे निश्‍चितपणे मानसिक रोगाच्या तक्रारी घेऊन ओपीडीमध्ये येणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. या महामारीतील मानसिक आरोग्याच्या तक्रारींमध्ये कोविडशी संबंधित चिंता आणि नैराश्य या तक्रारी येत आहेत. बर्‍याच लोकांना अशी भीती वाटते की त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना कोरोना होणार तर नाही ना! जे कोरोनाबाधित आहेत ते आणि /किंवा त्यांचे कुटुंबीय काळजीपोटी मदत मागताहेत. जे रुग्ण आधीच मानसिक रोगाने पीडित आहेत, त्यांचा आजार पुन्हा बळावताना दिसतो. तसेच या महामारीत स्वतःची नोकरी गमावलेले किंवा त्यांच्या धंद्यात झालेला तोटा सहन न झाल्यामुळे लोक तणावाशी संबंधित मानसिक रोगांच्या तक्रारी घेऊन येत आहेत.

व्यसन मोबाइलचे

कोरोनाशी निगडित ‘चिंता’ हीच मुख्य तक्रार घेऊन लोक मानसरोग तज्ज्ञांकडे येत आहेत. एक गोष्ट चांगली घडते आहे की योग्य वैद्यकीय सल्ला आणि मानसिक आधार त्यांना मिळाल्यानंतर त्यांचे आरोग्य पूर्वपदावर येते.
या महामारीमुळे संपूर्ण जगच आज ऑनलाईन पद्धतींचा वापर करीत आहे. त्यामुळे साहजिकच लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना दिवसभर मोबाईल बघण्याची सवय जडली आहे. आणि कुठल्याही गोष्टीची सवय किंवा अतिरेक म्हणजे मानसिक आजार होय. याला कोणत्याही संस्कृती किंवा वयाचे बंधन नाही. पण मोबाईलचे व्यसन हे जास्त करून लहान मुले आणि तरुण वर्गामध्ये दिसून येते. कशाला? ही सवय वयस्कर लोकांमध्येही दिसून येते, बर कां… पण लहान मुलांची आणि तरुणांची सवय दिसून पडते कारण त्यांच्या या सवयीचा दुष्परिणाम त्यांच्या शिक्षणातील गुणवत्तेवर, सामाजिक संवाद आणि व्यक्तिमत्त्व विकासावर झालेला दिसून येतो. भारतीय समाजात शैक्षणिक कामगिरीची दखल खूप गांभीर्याने घेतली जाते म्हणून मोबाइलचे व्यसन ही भारतीय पालकांसाठी खूप मोठी समस्या असून ती नेहमी वेळीच लक्षात येते.

मानसिक आजारांचे प्रकार

ज्याप्रमाणे शरीराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या रोगाच्या लक्षणांवरून शारीरिक आजार हे निरनिराळ्या प्रकारचे असतात त्याचप्रमाणे मानसिक रोगही अनेक प्रकारचे आहेत, ज्यामध्ये त्यामधील लक्षणांमध्ये विविधता दिसून येते. तरीही काही लक्षणे ही बर्‍याच मानसिक रोगांमध्ये सर्वसाधारणपणे सारखी आढळतात ती म्हणजे जास्त वेळ झोपणे, व्यक्तीच्या स्वभावाच्या विरुद्ध वर्तणूकीत बदल होणे, मनःस्थितीत (मूड) बदल जो बर्‍याच काळापर्यंत टिकून राहतो आणि सगळ्या दैनंदिन कार्यात दिसून येतो. ‘‘डिसऑर्डर किंवा विकार’’ म्हणजे जेव्हा लक्षणं इतकी वाईट असतात की ती व्यक्तीच्या रोजच्या दैनंदिन कार्यात अडथळा आणतात, व्यक्तीच्या समाजाशी असलेल्या संवादात अडथळा आणतात आणि व्यक्तीच्या शैक्षणिक किंवा व्यावसायिक कामात अडथळा निर्माण करतात. असा विशिष्ट वयोगट नाही ज्यात मानसिक विकार जास्त प्रमाणात दिसून येतात. ते कोणत्याही वयात होऊ शकतात. तरीसुद्धा काही मानसिक आजार हे विशिष्ट वयातच होताना दिसतात किंवा विशिष्ट वयात त्यांची सुरुवात होताना दिसते. उदाहरणार्थ – अतिचंचलता अवस्था (एडीएचडी) या मुलांमध्ये दिसून येतात, स्मृतिभ्रंश हा वयोवृद्धांमध्ये जास्त दिसून येतो. स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता)ची सुरुवात सर्वसाधारणपणे तरुण प्रौढावस्थेत होताना दिसते.

गोव्यातील मानसिक रुग्णांची आकडेवारी

गोव्यातील अगदी आत्ताच्या मानसिक रुग्णांची आकडेवारी निश्‍चितपणे सांगता येत नसली तरीही देशातील आत्महत्येची टक्केवारी पाहता गोव्यात त्याचे सरासरी प्रमाण जास्त आहे. गोव्यातील तरुणांपैकी १० टक्के तरुण हे नैराश्याने ग्रासलेले आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांमध्ये एक चतुर्थांश रुग्णांना मानसिक आजार असल्याचे दिसते. व्यसनासंबंधी बोलायचं तर महिलांमध्ये दारुचे व्यसन हे देशातील सरासरीपेक्षा गोव्यात जास्त आहे.

मानसिक आजार टाळता येतात का?

निरोगी जीवनशैलीचा अंगिकार करून, रचनात्मक ध्येय डोळ्यासमोर ठेवून, आयुष्यात संकटांशी दोन हात करण्याचे कसब शिकून घेऊन आणि एका सकारात्मक कुटुंबाचा आणि मित्रांचा आधार असेल तर ताण-तणावाशी संबंधित मानसिक आजार आणि व्यसने ही निश्‍चितपणे टाळता येतात. या सगळ्या गोष्टी एखाद्याचे आयुष्य सफल बनवतात, मग तो किंवा ती भलेही अनुवंशिकतेने कुटुंबात चालत येणार्‍या मानसिक विकाराने ग्रस्त असतील!

मानसिक आजारावरील उपचाराबद्दल बोलताना- या आजारांवर औषधे जास्त परिणामकारक आहेत की समुपदेशन जास्त महत्त्वाचे आहे हे सांगणे कठीण आहे. ह्या उपचारांच्या दोन वेगळ्या पद्धती आहेत, ज्यांची निवड रुग्णाला झालेल्या मानसिक आजाराचा प्रकार पाहून करण्यात येते. जसे शारीरिक आजारामध्ये फक्त औषधेच खूप चांगला परिणाम करतात. तर काही रोगांवर शस्त्रक्रियेचाच पर्याय योग्य असतो. इतर काहींमध्ये शस्त्रक्रिया आणि औषधे दोन्हींची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे मानसिक आजारात विविध उपचार पद्धती म्हणजे औषधोपचार, समुपदेशन आणि काही देशांमध्ये इलेक्ट्रो-कन्व्हल्सिव्ह थेरपीसुद्धा एकमेव म्हणून किंवा दुसर्‍या पद्धतीसोबत वापरली जाते. अर्थातच रुग्णामध्ये असलेली लक्षणे, रुग्णाचा इतिहास आणि मानसिक आजाराची तीव्रता या बाबींच्या आधारावरच उपचारपद्धती ठरवली जाते. सर्वसाधारण मानसिक रोगांवर दिले जाणारे औषधं हे एक तर शरीरातील कमतरता दूर करतात किंवा मेंदूच्या न्युरोट्रान्समीटरमधील असंतुलन दुरुस्त करतात, जे विविध शारीरिक क्रिया घडवून आणतात. उदा. विचारधारा, भावना, वर्तणूक, शिक्षण, स्मरण, कौशल्ये आणि जीवशास्त्रीय कार्ये जसे झोपणे, भूक लागणे, लैंगिक इच्छा इत्यादी.

समाजात जागरुकता आणण्याची गरज

अजूनही मला असं वाटतं की मानसिक आजारांबद्दल आपल्या समाजात आणखी जागरुकता आणण्याची गरज आहे. जागरुकतेच्या आणि मदत घेण्याच्या बाबतीत आपण इतर प्रगतशील देशांच्या तुलनेत मागे जरी असलो तरी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे की २१व्या शतकाच्या आधी असलेल्या आपल्या स्थितीपेक्षा आज आपण बर्‍याच चांगल्या स्थितीत आहोत. जर गोव्याच्याच लोकांचा विचार करायचा झाला तर मी असं म्हणेन की आपण खरंच खूप भाग्यवान आहोत जे इतक्या सुंदर राज्याचे आपण रहिवासी आहोत. जेव्हा आपण पाहतो की गोव्याबाहेरील लोकांना काही दिवस गोव्यात येऊन मजेत घालवण्याची योजना बनवताना खूप संघर्ष करावा लागतो, तिथे आपण गोमंतकीय म्हणून आपल्या भोवताली सुंदर निसर्गसौंदर्याने वेढलेला प्रदेश आहे जो स्वतःच एक ताण हलके करणारा पर्यावरणाचा भाग आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तणावामध्ये असाल, तुम्हाला नदी किनारी किंवा समुद्रकिनारी जाऊन एक फेरफटका मारण्याची गरज असते. ताणसंबंधित विकारांपासून बचाव करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पुरेसे मी विषद करू शकत नाही. संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम, निरोगी सवयी, छंद जोपासणे, कलाकुसरी करणे आणि स्वस्थ, आरोग्यदायी ध्येय समोर ठेवणे ही यशस्वी जीवनाची व आनंदाची गुरुकिल्ली आहे. तसेच, मी असं सांगू इच्छिते की प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय आहे आणि प्रत्येकाच्या गरजाही अगदी विलक्षण वेगवेगळ्या असतात. प्रत्येक व्यक्तीच्या तसेच इतरांच्याही अद्वितीयतेबद्दल आणि गरजांबद्दल जागरुक असणे- हेच तर आनंदाकडे जाण्याच्या वाटेवरचे पहिले पाऊल होय. ही गोष्ट जेव्हा आपण मान्य करत नाही आणि जसे आपण नसतोच तसे बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच अनेक मानसशास्त्रीय समस्या निर्माण होतात.

लोकांच्या मनातून कोविड-१९ ची भीती दूर व्हावी यासाठी…

तज्ज्ञांशी बोलून कृपया कोविड संबंधित तुमच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळवा. समस्या सोडवून घ्या. मी सोशल मिडियावर येणार्‍या माहितीच्या विरोधात नाहीये, तरी मी सांगेन की सोशल मिडियावर येणार्‍या संदेशांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. कोविड संबंधित ताण हा जास्त करून अज्ञानामुळे आलेला असतो. तेव्हा कृपा करून तज्ज्ञांकडून माहिती करून घ्या आणि ताण घालवा. जरी कधीतरी तुम्हाला किंवा कुमच्या कुटुंबाच्या एखाद्या सदस्याला काही गंभीर लक्षणं जाणवलीत तर लगेच डॉक्टरांकडे जा. कोविडचे निदान होईल या भीतिने डॉक्टरांकडे जाण्याचे टाळू नका किंवा उशीर करू नका. लवकर निदान आणि उपचार इथे महत्त्वाचे आहेत. जर कोविडशी संबंधित तुमच्यावर कुणी आरोप केले, काही ताण, तणाव, चिंता किंवा नैराश्य तुम्हाला जाणवायला लागले तर ताबडतोब मानसरोग तज्ज्ञांकडे जा. गोव्यात सध्या बरेच मानसरोगतज्ज्ञ आणि समुपदेशक ऑनलाइन सेवा माफक दरात देत आहेत. त्यांच्या सेवेचा लाभ जरूर घ्या. कृपा करून लक्षात घ्या की निरोगी शरीर असण्यासाठी पहिले आपले मन निरोगी असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मानसिक ताण असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः आजच्या आव्हानात्मक स्थितीत.
याशिवाय, तुमच्या मनाला सतत सांगा की ही स्थितीही बदलेल. जरी तुम्ही या कठीण काळात वाचलात किंवा त्यातून सुरक्षित आणि स्वस्थपणे बाहेर आलात तरी तेही चांगलेच आहे. हे लक्षात घ्या की आपण सर्वजण एकाच बोटीतून प्रवास करीत आहेत. त्यामुळे जरी त्यात दुःख असलं, तरी दुःखी होऊ नका. त्यापेक्षा या संकटावर मात करण्यासाठी आत्ता तुम्ही काय चांगले काम करू शकता त्याचा विचार करा. स्वतःला मदत करा आणि सगळे ठणठणीत रहावेत म्हणून तुमच्या प्रियजनांनाही मदत करा.

मानसिक रोगांचे मूळ कोठे आहे?

दुर्दैवाने मानसिक रोगांचे मूळ माहीत नाही. तरीही बरेच गृहीतक आहेत की ते आजारांशी संबंधित असू शकतात. त्यामध्ये जनुकांचे शास्त्र, लहानपणातील समस्या जसे आघात, गैरवर्तन, विस्कळीत कुटुंबं, इत्यादी. थोडक्यात, आम्ही त्याला ‘नेचर-नर्चर-कल्चर’ असं म्हणतो. ‘नेचर’ म्हणजे एखाद्याचा जनुकीय संबंध, रोगप्रतिकारक शक्ती, औषधांना प्रतिसाद, चयापचय क्रिया आणि इतर जीवशास्त्रीय घटक. ‘नर्चर’ म्हणजे एखाद्याला वाढवणे, कौटुंबिक मूल्ये, मित्रमंडळींच्या गटाची मूल्ये, एखाद्याची वृत्ती आणि विश्‍वास आणि एखाद्याचे व्यक्तिमत्त्व. ‘कल्चर’ म्हणजे सर्वसाधारण नीतिनियम, नैतिकता आणि जीवनमूल्ये, सामाजिक तत्त्वं, सर्वसामान्य धारणा आणि निषिद्ध मानलेल्या गोष्टी.
कौटुंबिक वातावरण हे बर्‍याच मानसिक आजारांमध्ये, स्किझोफ्रेनिया, बायपोलक डिसऑर्डर, ऑटीझम, स्मृतिभ्रंश- महत्त्वाची भूमिका बजावते. इथे इशारा करणार्‍या लक्षणांपासून सावध राहणे गरजेचे आहे. भविष्यात चांगल्या प्रतीचे जीवन जगता यावे म्हणून शक्य तितक्या लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.