मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने मांडवीतील प्रदूषणात घट

0
97

>> विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची माहिती

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मांडवी नदीतील मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने नदीतील प्रदूषणात लक्षणीय अशी घट झाली असल्याचे दिसून आले आहे. सेंटिनेल-२ ह्या उपग्रहाने केलेल्या निरिक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
विविध प्रदूषणकारी घटकांमुळे गेल्या काही वर्षांत मांडवी व जुवारी या नद्यांचे पाणी प्रदूषित होऊ लागलेले असून जैवविविधतेचेही मोठे नुकसान झालेले आहे.

२०१४ पासून मांडवी नदीतील सीडीओएमच्या प्रमाणात नजर ठेवली जात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या खाडीत प्रदूषणामुळे सीडीओएम्‌चे प्रमाण नेहमीच जास्त असल्याचे आढळून आले आहे, मात्र २०२० साली केंद्र सरकारने कोविड संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या काळात म्हणजेच २४ मार्च ते ८ जून या दरम्यान सीडीओएमचे प्रमाण लक्षणीयरित्या म्हणजेच दुपटीने कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्याशिवाय पाण्यात विरघळणार्‍या द्रव्यांचे प्रमाणदेखील कमी झाले असल्याचे आढळून आले आहे. कोविडमुळे जलसफरी तसेच नदीतून होणारी अन्य जहाजांची वाहतूक, जहाजबांधणी आणि इतर व्यावसायिक आस्थापने बंद असल्याने नदीतील मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात बंद आहे. परिणामी सीडीओएम व विविध प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. सीडीओएम म्हणजे पाण्यात विरघळलेल्या जैविक घटकांचे प्रमाण होय. पाण्यात सीडीओएमचे प्रमाण खूप जास्त असेल तर पाण्यातून प्रकाश परावर्तीत होऊ शकत नाही.