माध्यान्ह आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस पावले

0
211

>> मुख्यमंत्री पर्रीकर यांची ग्वाही

राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या माध्यान्ह आहाराचा दर्जा वाढवण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे शिक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला माध्यान्ह आहारासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना पर्रीकर बोलत होते.
राज्यातील स्वयंसहाय्य गटांकडून शाळांना जो माध्यान्ह आहार पुरवला जातो त्याचा दर्जा समाधानकारक नाही. पौष्टिक व स्वच्छ अन्न पुरवण्यास या गटांना अपयश आले आहे. काही वेळा शिळे अन्न पुरवण्यात येते. तसेच बर्‍याच वेळा अन्नात पाल अथवा झुरळेही असल्याचे आढळून आलेले आहे. दुषित व अस्वच्छ अन्नामुळे ते सेवन केल्यानंतर मुले आजारी पडण्याच्याही घटना दरवर्षी घडत असतात अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली. माध्यान्ह आहार पुरवण्याचे कंत्राट ‘अक्षयपात्र’ला देण्याचा विचार आहे काय, असे सिल्वेरा यांनी विचारले. मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांना पौष्टिक व स्वच्छ आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला असा आहार पुरवण्यात अशयपात्र यशस्वी ठरले आहे. देशातील १० ते ११ राज्यांतील विद्यार्थ्यांना ह्या घडीला ‘अक्षयपात्र’ माध्यान्ह आहार पुरवित आहे असे सांगून आमचाही त्यांना हे कंत्राट देण्याचा विचार होता. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.राज्यातील स्वयंसहाय्य गटांकडून विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरवण्यासाठीचे कंत्राट काढून घेऊ नका. तसे केल्यास गोव्यातील या गटांचे नुकसान होईल असे सिल्वेरा म्हणाले. यावर पर्रीकर म्हणाले की मूळ उद्दिष्ट व उद्देश आहे तो विद्यार्थ्यांना चांगले अन्न देण्याचा. त्यामुळे सरकारचा सगळा भर आहे तो त्यावर. मात्र, याचा अर्थ आम्ही स्वयंसेवी गटांना दिलेले हे कंत्राट रद्द करणार आहोत, असा अर्थ मात्र कुणी काढू नये. तसा निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा आहार पुरवण्यासाठी स्वयंसेवी गटांना कमी पैसे दिले जातात. त्यामुळे त्या पैशांत चांगले व पौष्टिक अन्न पुरवणे त्यांना शक्य होत नाही. त्यांना आहारासाठीचे दर वाढवून द्यावेत, अशी मागणी सिल्वेरा यांनी यावेळी केली. यावर उत्तर देताना पर्रीकर म्हणाले की पैसे कमी दिले जातात हे खरे नव्हे. प्राथमिक विद्यार्थ्यांमागे ६ रु. ११ पैसे तर माध्यमिकसाठी ७ रु. २६ पैसे दिले जात असल्याचे ते म्हणाले. हे दर वाढवण्याची गरज आहे असे दिसून आल्यास ते वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी आमदार नीलेश काब्राल यानी हे कंत्राट ‘अक्षयपात्र’लाच द्या. तसे केल्यास राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना चांगले अन्न तर मिळेलच. शिवाय सर्वांना एकसारखे व एका दर्जाचे अन्न मिळू शकेल, असे नमूद केले. आपल्या कुडचडे मतदारसंघातील सुमारे ६० टक्के मुले ह्या आहाराचे सेवन करीत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.