दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ मे २०१८ पर्यंत खुले करणार

0
93

>> आरोग्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्‍वासन

मडगाव येथे उभारण्यात येत असलेले नवे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ मे २०१८ पर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल विधानसभेत दिले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी विचारलेल्या मूळ प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात डॉक्टर्स, नर्सेस यांची संख्या किती आहे असा प्रश्‍न कामत यांनी विचारला होता.
यावेळी कामत यांनी हॉस्पिसियो इस्पितळाच्या दुर्दशेचा पाढाच सभागृहात वाचला. इस्पितळाची इमारत ढासळू लागली आहे. काही दिवसांपूर्वी इमारतीच्या एका मजल्यावरील एक रॅलिंग अचानक कोसळून एक महिला जखमी झाली होती. सदर रॅलिंग थेट तिच्या अंगावर कोसळलले असते तर ती जागीच गतप्राण झाली असती. पण सुदैवाने तसे न घडल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे ते म्हणाले. या इस्पितळात दरवर्षी ३३ हजार रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात.
बाह्यरुग्ण विभागात उपचार घेऊन जाणार्‍यांची संख्या लाखोच्या घरात असल्याचे ते म्हणाले. मात्र, असे असताना या इस्पितळात डॉक्टर्स व नर्सेसची कित्येक पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना गोमेकॉत पाठवण्यात येते. तेथील ‘स्कॅन’मशीन चालत नाही. इस्पितळाच्या इमारतीची लिफ्ट चालत नाहीत. रुग्णांसाठी बेडशिट्‌स नाहीत. प्रसूती विभागात प्रसूती झालेल्या प्रत्येकी तिघा महिलांना एका खाटीवर झोपले जाते, असे कामत यांनी यावेळी सांगितले. यावर उत्तर देताना मडगाव येथील अद्ययावत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम मे २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ते सुरू झाल्यानंतर जनतेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचे राणे म्हणाले. सध्या हॉस्पिसियोसाठी १६ डॉक्टर्स व १३ नर्सेस्‌ची पदे भरण्याची गरज आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले. आपण ह्या इस्पितळावर पूर्ण लक्ष ठेवून असून तेथून रोज आपल्याला ई मेलद्वारे माहिती पाठवण्यात येत असते. आपण दररोज त्या मेल्सवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्या डॉक्टर्सची लवकरच भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हस्तक्षेप करताना दिगंबर यांनी तातडीने न्यूरो सर्जनची गरज व्यक्त केली. न्यूरोसर्जन नसल्याने रस्ता अपघातातील जखमींचे हाल होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी लवकरच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी हॉस्पिसियोतील समस्यासंबंधी चर्चा करून त्या दूर करण्यासाठी पावले उचलण्यात येतील अशी ग्वाही दिली. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार चर्चिल आलेमाव, नीलेश काब्राल, इजिदोर फर्नांडिस आदींनी महत्त्वाच्या सूचना केल्या.