Home Featured मातीतले मार्दव

मातीतले मार्दव

0

सार्वत्रिक सांस्कृतिक अधःपतनाचे आणि मूल्यर्‍हासाचे बेफाम वादळी वारे अवतीभवती घोंगावत असताना अभिजात संस्कृतीचा आणि जीवनातील उच्च उदात्त मानवी मूल्यांचा नंदादीप सतत तेवता ठेवण्याची धडपड करणारी जी मोजकीच माणसे आपल्या गोव्यामध्ये आहेत, त्यातील एक अध्वर्यु डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. राजकारणी पुढार्‍यांच्या आणि प्रसिद्धीलोलुपांच्या वाढदिवसाचे ढोल नेहमीच जोरजोरात पिटले जात असतात, अनेकजण तर स्वतःच स्वतःचे सोहळे साजरे करतानाही लाज बाळगीत नाहीत, परंतु अशा मूल्यनिष्ठ व्यक्तीच्या अमृतमहोत्सवी वाढदिनी मात्र गोव्याच्या भूमीमध्ये विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्येही सारा शुकशुकाट आहे ही उदासीनता बोलकी आहे.
‘विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पुज्यते’ असे संस्कृत सुभाषित आहे. म्हणजे विद्वान आणि राजा यांची कधी तुलनाच करू नये असे सुभाषितकार सांगतात, कारण राजाला फक्त त्याच्याच देशामध्ये सन्मान मिळतो, पण विद्वानांना सर्वत्र सन्मानाने वागवले जाते असे त्यांचे म्हणणे, परंतु दुर्दैवाने आज काळच असा आला आहे की सर्वत्र नेमकी उलटी गंगा वाहते आहे. पात्रता नसलेली माणसे मनसोक्त मिरवून घेत आहेत, मानसन्मान मिळवीत आहेत, तर विद्वान, व्यासंगी माणसे कुठल्या तरी कोपर्‍यात उपेक्षेचे जिणे जगत आहेत. अत्यंत सामान्य वकुबाच्या व्यक्तींच्या द्वेष आणि मत्सराची बळी ठरत आहेत. सदैव सत्ताधार्‍यांच्या पदराखाली वावरणार्‍या तथाकथित विद्वानांचे सोडून द्या, परंतु सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी यांची कोणतीही अपेक्षा न बाळगता कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या बाण्याने प्रकाशझोतापासून आणि झगमगाटापासून दूर राहून आपले नियत कार्य करण्यात व्यग्र असलेली माणसे येणार्‍या पिढ्यांना निरपेक्षरीत्या दिशा दाखवीत असतात. मात्र, आम समाजाचे लक्ष त्यांच्याकडे क्वचितच जाते. अशाच अलक्षितांपैकी डॉ. कोमरपंत हे एक आहेत. एका हळूहळू अस्तंगत होत चाललेल्या मूल्यनिष्ठ जीवनसरणीचे ते प्रतिनिधी आहेत.
घरच्या गरीबीशी झुंजत आणि निरक्षर वडिलांकडेे हट्ट धरून जिद्दीने शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपली अध्यापन कारकीर्द उभी केली. बहुतेक शिक्षक हे नुसते तोंडाने शिकवत असतात, पण काहींचे जीवनच इतरांना आदर्श मूल्यशिक्षण देत असते. कोमरपंत सरांचे जीवन हे असे उच्चतम नैतिकतेच्या पायावर एखाद्या दीपस्तंभासारखे उभे आहे. पिढ्यामागून पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या होत गेल्या आहेत. लहानांतील लहान होऊन आणि मोठ्यांमध्येही स्वतःकडे अकारण लहानपण घेऊन सर वागत आले म्हणूनच तर विचारशील व्यक्तींच्या आदरास पात्र ठरले आहेत. यः क्रियावान् स पंडितः अशी पंडिताची व्याख्या सांगितली गेली आहे. राजकारण, धर्मकारण, विखारी समाजकारण याच्या सापळ्यात न अडकता केवळ सांस्कृतिक क्षेत्रामध्ये निरहंकारी भावनेने सर्वांंमध्ये मिळूनमिसळून, त्यांच्यातलेच एक होऊन सर सतत वावरले, गोव्याच्या कानाकोपर्‍यांत भटकले. सतत सक्रिय आणि अर्थपूर्ण जीवन जगत आलेे आणि त्या जगण्याचा आनंद आपल्या भोवतीच्या माणसांनाही सतत मिळवून दिला.
मुळात कोमरपंत सर या इथल्या नीतीभ्रष्ट, मूल्यभ्रष्ट कल्लोळापासून कटाक्षाने शतयोजने दूर राहत आले. त्यांच्या अवतीभवती बहुधा केशवसुत, बालकवी आपल्या कविता वाचत असतील, रवींद्रनाथ गाणी गात असतील, टिळक गीतारहस्य उलगडत बसले असतील, सानेगुरूजी गोड गोष्टी सांगत असतील. बोरकरांच्या कवितेची लकेर त्यांच्या कानी पडत असेल. रामाणींच्या गूढ प्रतिमांचे कोडे ते उकलत बसलेले असतील. आजूबाजूच्या नकोशा वाटणार्‍या अनुभवांतून दूर जाण्यासाठी हा पारलौकिक वाङ्‌मयीन दिलासा त्यांनी शोधला असेल. त्यामुळेच तर त्यांची भाषाही तशीच परिपक्व प्रौढ बनली आहे. परंतु खरोखरी कोमरपंत म्हणजे ‘कोमलपंत’ आहेत. गोव्याच्या मातीतले मूर्तिमंत मार्दव त्यांच्या बोलण्यावागण्यात सामावलेले आहे.
कोरोना आणि निवडणुकांच्या गदारोळात कोमरपंत सरांचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची उसंत कोणापाशी नसावी, परंतु या त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनाच्या आम्ही गोमंतकाच्या समस्त सांस्कृतिक जगताच्या वतीने त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो व शतायुषी होण्याची कामना करतो. अशी दिशादर्शक सज्जन माणसे समाजाला दीपस्तंभ म्हणून हवी आहेत. चंद्रमे जे अलांच्छन, मार्तंड जे तापहीन ते सर्वांहि सदा सज्जन सोयरे होतु असे ज्ञानेश्वरमाऊलींनी ज्याचे वर्णन केले आहे, त्याला याहून दुसरी कोणती व्यक्ती पात्र असेल बरे? कोमरपंत सर, जीवेत शरदः शतम्!