गोव्याला स्टार्टअपचे जागतिक केंद्र बनवणार : अमित शहा

0
23

>> साखळीतील जाहीर प्रचारसभेत आश्‍वासन; विकासकामांचा घेतला आढावा

भाजप सरकारने गेल्या १० वर्षांच्या राजवटीत राज्यात विकासगंगा आणली. गोव्यात अनेक पायाभूत सुविधांचे जाळे विणले. त्यामुळे राज्याची विकासाच्या दिशेने घौडदौड सुरू आहे. २०२५ पर्यंत गोव्याला स्टार्टअपसाठी सर्वात पसंतीचे केंद्र बनवण्याचे भाजपचे ध्येय आहे. गोव्याला स्टार्टअपचे जागतिक केंद्र बनवले जाणार असून, ५०० इनोव्हेटिव्ह आंतरराष्ट्रीय स्टार्टअप गोव्यात निर्माण केले जातील, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिली.

साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रचारासाठी काल घेतलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, साखळी भाजपचे अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सुलक्षणा सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय अमित शहा यांनी डिचोली मतदारसंघात प्रचारसभा घेतली, तसेच डिचोली व मये मतदारसंघात त्यांनी घरोघरी प्रचार केला.

गोवा हा छोटासा प्रदेश आहे, हे खरे आहे; परंतु तो भारतमातेच्या माथ्यावरील टिळा आहे. आजच्या घडीला देशात सर्वात जास्त कल्याणकारी योजना गोव्यात राबवल्या जात आहेत. प्रति व्यक्ती सर्वाधिक उत्पन्न गोव्यातील लोकांचे आहे. घरोघरी शौचालय, आधार नोंदणी, १०० टक्के कोविड प्रतिबंधक लसीकरण यामध्ये गोवाच सर्वात पुढे आहे. प्रत्येक घरात वीज, पाणी आणि गॅस सिलिंडर पोहोचवण्याचे काम भाजप सरकारने केले, असेही शहा म्हणाले. कॉंग्रेसने केवळ योजना आखल्या; मात्र त्यांची अंमलबजावणी केली नाही. कॉंग्रेसने विकासकामांचे भूमिपूजन केले; मात्र ती पूर्णत्वास नेली नाहीत, अशी टीका शहा यांनी केली. गांधी कुटुंबासाठी गोवा हे एक पर्यटन स्थळ आहे, असेही ते म्हणाले. डबल इंजिन सरकार नसते, तर गोव्यात दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकला असता का, अटल सेतू आणि झुआरी पूल यासारखे पूल राज्यात निर्माण झाले असते का, असा सवालही त्यांनी विचारला.

केंद्रातील यूपीए सरकारच्या काळात २००९ ते २०१४ या कालावधीत गोव्याला दरवर्षी केवळ १२० कोटी मिळत होते. केंद्रात एनडीएचे सरकार येताच आता दरवर्षी २५०० कोटींहून अधिक निधी मिळत आहेत. तसेच रस्त्यांच्या विकासासाठी आतापर्यंत ४००० कोटींचा निधी राज्याला मिळाला आहे, असेही शहा म्हणाले.

मुख्यमंत्री पदासाठी डॉ. सावंत यांनाच पसंती
गोव्यात पूर्ण बहुमताचे भाजपचे सरकार स्थापन होणार असून, डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांत राज्यातील खाणी सुरू होतील, असे आश्‍वासन अमित शहा यांनी दिले. डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २२ हून अधिक जागा जिंकून डॉ. सावंत हेच पुन्हा राज्याची धुरा सांभाळतील, असेही शहा म्हणाले.